चीनच्या बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन


बीजिंग : चीनच्या वुहानमध्ये जन्मलेल्या कोरोनाने सध्या जगभरात थैमान घातलेले असतानाच त्याच चीनमधील बीजिंगमध्ये आता पुन्हा एकदा कोरोना व्हायरस वेगाने पसरण्यास सुरुवात झाली आहे. तेथील कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बीजिंगमधील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. बीजिंगमध्ये दोन कोरोनाग्रस्त आढळले असून चीनमध्ये 10 नवीन कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

56 दिवसांनंतर बीजिंगमध्ये गुरुवारी 11 जूनला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर काल पुन्हा 2 रुग्ण आढळल्याने बीजिंगमध्ये तातडीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. परदेशात अडकलेल्या लोकांना घेऊन जाणारी कोणतीही आंतरराष्ट्रीय उड्डाणे किंवा विमान बीजिंगमध्ये दाखल झाले नाहीत. याशिवाय बीजिंगमधील सर्व उड्डाणे इतर शहरांकडे वळविण्यात आली आहेत.

या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून बीजिंगच्या अधिकाऱ्यांनी याआधी शहरातील इतर घाऊक बाजारपेठा बंद ठेवल्या होत्या. यानंतर मटण आणि इतर बाजारपेठाही पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी बीजिंगमध्ये दोन महिन्यांपर्यंत कोणतेही खेळ होणार नाहीत असे सांगण्यात आले होते. सध्याची स्थिती पाहता बीजिंकमध्ये खेळ सुरू करण्यात येणार नाहीत यासंदर्भात तेथील प्रशासनाने एक नोटीस बजावली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग पसरण्याची सुरुवात चीनच्या वुहानपासून झाल्यानंतर जवळपास 213 देशांमध्ये हा व्हायरस पसरला.

Leave a Comment