‘तारक मेहता…’मध्ये दयाबेनच्या वापसीवर निर्मात्यांनी सोडले मौन


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेने मागील अनेक वर्षांपासून सर्वांचे मनपासून मनोरंजन केले आहे. त्याचमुळे ही मालिका टीआरपीमध्ये स्थान बनवून ठेवण्यात यशस्वी ठरली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वीच अनलॉक 1 मध्ये देण्यात आलेल्या शिथीलतेमुळे आता या मालिकेच्या चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात होणार आहे. त्यातच मागील बऱ्याच काळापासून चर्चेत असलेली अभिनेत्री दिशा वकानी या शोमध्ये वापसी करणार असल्याची चर्चा होती. पण यावर आता या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी मौन सोडले आहे.

दिशा वकानी या मालिकेमध्ये परत येणार असून या मालिकेच्या सेटवर एक सेलिब्रेशनही केले जाणार असल्याचे मागील काही दिवसांपूर्वी बोलले जात होते. यानंतर पिंकव्हिला या मनोरंजन विषयक संकेतस्थळाला दिलेल्या एका मुलाखतीत या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दिशाच्या मालिका वापसीवर मौन सोडले. ते सुरुवातीला हसले आणि म्हणाले, आधी मालिकेचे चित्रीकरण तर सुरू होऊ द्या. याबाबत मी सध्या काहीही सांगू शकत नाही. सध्या आम्ही चित्रीकरण पुन्हा सुरू करण्याची तयारी करत आहोत. जेव्हा चित्रीकरण सुरू होईल तेव्हा मी याबाबत काही सांगू शकतो.

असित कुमार मोदी पुढे म्हणाले, आम्हाला चित्रीकरणाला महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली आहे आणि मी त्यांच्या निर्णयावर खूप खूश आहे. सध्या आम्ही हे चित्रीकरण सुरू करण्याची तयारी करत आहोत. आशा करतो की, लवकरच सर्वकाही ठिक होईल. आम्ही सरकारच्या गाइडलाइन्सचे पालन करून शूटिंग लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. लवकरच नवे एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

Leave a Comment