मुंबई – राज्याभोवती कोरोनाचा आवळलेला फार्स काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही, त्यातच आता राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली लक्षणीय वाढ चिंतेत आणखी भर घालत आहे. पण यामध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे आता सार्वजनिक आरोग्य विभागाने अशा रुग्णांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश दिले आहेत. राज्य सरकारने याबाबत एक नियमावलीही सादर केली आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांवर होणार आता घरच्या घरी उपचार; अशी आहे नियमावली
राज्य सरकारच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक नियम शिथिल केल्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर रुग्णांवर होणार खर्च जास्त असल्याने आणि रुग्णालयांत बेड्सची उपलब्धताही कमी असल्यामुळे सरकारने आता कोरोनाग्रस्तांवर घरच्या घरी उपचार करण्याचे आदेश काढले आहेत. त्यानुसार कोरोनाग्रस्तांचा वर्गीकरण करण्यात आले आहे. सौम्य आणि अतिसौम्य लक्षणे असलेले, माध्यम तीव्र लक्षणे आणि तीव्र लक्षणे असलेले असे वर्गीकरण करण्यात आले आहे. त्याचबरोबर खालील सरकारी नियमावलीचे रुग्णांना काटेकोर पालन करावे लागणार आहे.
- रुग्णाला अतिसौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले असावे.
- अलगीकरणासाठी रुग्णाच्या घरी योग्य सोय उपलब्ध असावी.
- दिवस रात्र काळजी घेणारी व्यक्ती घरी उपलब्ध असावी.
- काळजी वाहू व्यक्ती आणि उपचार देणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था उपलब्ध असावी.
- हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनची मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार आणि प्रोटोकॉलनुसार घ्यावी.
- मोबाईलवर आरोग्य सेतू अप्लिकेशन डाउनलोड करावे.
- जिल्हा सर्वेक्षण अधिकारी आणि सर्वेक्षण पथकास रुग्णांनी नियमितपणे प्रकृतीबाबत पाठपुरावा विषयी माहिती देणे अनिवार्य आहे.
- गृह विलगीकरण करण्याविषयी रुग्णाने स्वतः प्रतिज्ञापत्रक भरून द्यावे आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
- रुग्णात १७ दिवसांनंतर लक्षणे नसतील तर त्याला गृह विलगीकरणातून मुक्त करावे.