अर्थव्यवस्थेवरुन केंद्र सरकारवर टीका करणाऱ्या राजीव बजाज यांना फडणवीसांचे उत्तर


मुंबई – विधानसभेचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारने कोरोनाऐवजी अर्थव्यवस्थेचाच आलेख खाली आणल्याची टीका करणाऱ्या उद्योगपती आणि बजाज ऑटोचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांच्या वक्तव्यावर आपले मत व्यक्त केले आहे. राजीव बजाज हे कोरोनाचे तज्ज्ञ नसून त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. शनिवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी हे मत त्यांनी व्यक्त केले.

मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील उद्योग क्षेत्रामध्ये बजाज कुटुंबांचे मोठे नाव आहे. नुकतेच लॉकडाउनसंदर्भात मत व्यक्त करताना राजीव बजाज यांनी केंद्र सरकारने चुकीचा आलेख खाली आणल्याची टीका केली होती, यावर तुमचे काय मत आहे?, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला. फडणवीस यांनी या प्रश्नाला उत्तर देताना राजीव बजाज यांचे मत अंतिम सत्य असू शकत नसल्याचे म्हटले. वाहन निर्मिती क्षेत्रातील बजाज कुटुंब हे तज्ज्ञ आहेत.

आरोग्य क्षेत्रातील किंवा कोरोनाचे ते तज्ज्ञ नसल्यामुळे कोरोनासंदर्भात काय केले पाहिजे हे त्यांचे मत अंतिम सत्य असू शकत नाही. स्कूटर कशी बनवायला हवी होती, रिक्षा कशी बनवायला हवी होती किंवा कार कशी बनवायची यासंदर्भात ते बोलले असते तर ते अंतिम सत्य असू शकते. पण कोरोनादरम्यान काय केले पाहिजे याबद्दल तुमचे किंवा माझे मत असू शकते तसेच राजीव बजाज यांचे एक मत असू शकते, असे उत्तर फडणवीस यांनी दिली.

फडणवीस यांनी राजीव बजाज यांनी दिलेल्या स्पेनच्या उदाहरणावरुन स्पेनमधील मृत्यूदराचा दाखला दिला. जे स्पेनचे उदाहरण त्यांनी दिले, तिथे लॉकडाउन करण्यात आला नाही. तिकडचे व्हिडिओ समोर येत आहेत ते बघा. त्यावर तज्ज्ञांची मते समोर आली आहेत. तेथील मृत्यूदर कमी करता आला असता, पण तो थांबवण्यात आला नाही. तिकडे लॉकडाउन न केल्याने झालेल्या या गोष्टींचीही चर्चा आहे.

मला वाटते एखाद्या गोष्टीबद्दल प्रत्येक व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी तसे मत मांडलं आहे. हे काही तज्ज्ञांचे मत नसल्याचे मला वाटते, असं फडणवीस म्हणाले. पण बजाज यांनी भारतामध्ये अगदी कठोर लॉकडाउन लागू करण्यात आला असे मत मांडले यावर काय सांगाल असे विचारण्यात आले असता फडणवीस यांनी, हा कठोर लॉकडाउन होता असे त्यांना वाटते, पण मला नाही वाटत हा कठोर होता. एखादा तज्ज्ञ हे बोलला असता तर वेगळी गोष्ट आहे. राजीव बजाज तज्ज्ञ नसल्याचे उत्तर दिले.

Leave a Comment