हॉस्पिटलचे बिल नाही भरले म्हणून वृद्धाला चक्क बेडला बांधले


भोपाळ : हॉस्पिटलचे बिल पूर्ण न भरल्यामुळे एका वृद्ध रुग्णाला चक्क बेडला बांधून ठेवल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. हा संपूर्ण प्रकार मध्य प्रदेशमधील शाजापूर जिल्ह्यातील एका हॉस्पिटलमध्ये घडला. दरम्यान रुग्णांच्या नातेवाईकांनी बिल थकवल्यामुळे हॉस्पिटलने हे कृत्य केल्याचा आरोप केला आहे. तर हा आरोप हॉस्पिटलकडून मात्र फेटाळून लावण्यात आला आहे.

या वृद्ध रुग्णाचे लक्ष्मीनारायण असे नाव आहे. जिल्हा रुग्णालयातून या रुग्णाला रेफर करण्यात आले होते. हॉस्पिलटलचे पूर्ण बिल त्यांच्या कुटुंबियांनी भरले नाही म्हणून लक्ष्मीनारायण यांना बेडला हातपाय बांधून ठेवण्यात आल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. हॉस्पिटलला कुटुंबियांनी आधीच पैसे नसल्याची पूर्वकल्पना दिली होती. तरीही हॉस्पिटलतील कर्मचारी आणि डॉक्टरांनी उपचार करून 11000 रुपयांचे बिल भरण्यास सांगितले. बिल भरले नाही म्हणून रुग्णाला दोरीने बांधल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.


ज्या दिवशी लक्ष्मीनारायण यांना हॉस्पिटलत दाखल करण्यात आले, तेव्हाच 6 हजार रुपये भरले होते. त्यानंतर आमच्याकडील पैसे संपले. दोन दिवसांपूर्वी आम्हाला आणखी पाच हजार रुपये जमा करायला सांगण्यात आले. आमच्याकडे पैसे नसल्यामुळे पुढची ट्रीटमेंट करू नका, अशी त्यांच्या मुलीने विनंती केली. पण हॉस्पिटलने पूर्ण पैसे भरल्याशिवाय रुग्णाला सोडणार नाही, असे सांगितल्याचा आरोप लक्ष्मीनारायण यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. तर हा आरोप हॉस्पिटलने फेटाळून लावला आहे. लक्ष्मीनारायण यांना बांधून ठेवलेले नाही. त्यांना झटके येत असल्याने ते बेडवरून खाली पडू नयेत यासाठी अशापद्धतीने त्यांना ठेवण्यात आल्याचे स्पष्टीकरण हॉस्पिटलकडून देण्यात आले आहे.

Leave a Comment