बांगलादेशकडून ठाकरे सरकार खरेदी करणार रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन


मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोनाविरोधात लढ्यात आणखी एक मोठे पाऊल उचलले असून राज्य सरकार आता रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन खरेदी करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. MERS- CoV आणि SARS मध्ये प्रयोगशाळा, प्राणी आणि वैद्यकीय अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे आशादायक परिणाम मिळाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान अमेरिकेकडून कोरोनाबाधितांसाठी रेमडेसिवीर औषध संजीवनी ठरत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याआधी भारतात कोरोनाबाधितांवर रेमडेसिवीर औषधाची चाचणी केली जाणार असल्याचे आरोग्य मंत्रालयानेही सांगितले होते.


याबाबतची माहिती देणारे ट्विट करताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रेमडेसिविरचे १० हजार इंजेक्शन महाराष्ट्र शासन खरेदी करणार असून प्रयोगशाळा, प्राणी आणि क्लिनिकल अभ्यासाच्या पुराव्यांच्या आधारे MERS- CoV आणि SARS मध्ये यास आशादायक परिणाम मिळाला आहे, जोदेखील कोरोनामुळे होतो. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटना कोरोनाच्या उपचारात त्याचे काही सकारात्मक परिणाम होऊ शकतात, असे सुचवते. हे औषध अत्यंत महाग असून गरीब लोकांना देण्याच्या दृष्टीने व्यवस्था केली जात असल्याचे म्हटले आहे.


एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजेश टोपे यांनी दिलेल्या या निर्णयाबद्दल माहितीनुसार, मुंबईतील काही रुग्णांवर चाचणी केली असता प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे पहायला मिळाले. हे औषध त्या रुग्णांनीच खरेदी करुन आणले होते. हे इंजेक्शन सरकारनेही खरेदी केले पाहिजे, असे सांगितले जात होते. मला या इंजेक्शनने कोरोनाचे विषाणू नष्ट होतात अशी माहिती देण्यात आली आहे. हे औषध खूप महागडे आहे आणि ते गरिबांनाही उपलब्ध झालं पाहिजे यादृष्टीने १० हजार इंजेक्शन खरेदी करण्याचे ठरवले आहे. पण हे औषध कोणाला द्यायचे, नाही द्यायचे याचा काही प्रोटोकॉल असतो. हे औषध आऊट ऑफ स्टॉक असते. हे औषध आपल्याकडे उपलब्ध नसल्यामुळे याची खरेदी बांगलादेशकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा चांगला परिणाम होईल अशी आशा आहे.

Leave a Comment