गुंतवणूकदारांचा जिओकडे ओघ; सिल्व्हर लेकची अजून 4546 कोटींची गुंतवणूक


नवी दिल्ली – सध्याच्या घडीला रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचा ओघ वाढत आहे. गेल्या महिन्यातील 3 मे रोजी अमेरिकेची खासगी इक्विटी कंपनी सिल्व्हर लेकने जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा जिओमध्ये अतिरिक्त 4,546 कोटी रुपयांची गुंतवणूक करत असल्याचे सिल्व्हर लेकने जाहीर केले आहे.

सिल्व्हर लेक 4,546 कोटी रुपयांच्या या गुंतवणूकीद्वारे जिओमध्ये अतिरिक्त 0.93 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल. यापूर्वी कंपनीने 3 मे रोजी केलेल्या 5,656 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे कंपनीकडे जिओची 1.15 टक्के हिस्सेदारी होती. आता सिल्व्हर लेककडे एकूण 10,202.55 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह जिओची हिस्सेदारी 1.15 टक्क्यांहून वाढून 2.08 टक्के झाली आहे. सिल्व्हर लेककडून या गुंतवणूकीबाबत शुक्रवारी माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे शुक्रवारीच अबू धाबीच्या ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’नेही जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 9,093.60 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीद्वारे ‘मुबादला इन्व्हेस्‍टमेंट कंपनी’ने जिओमध्ये 1.85 टक्के हिस्सेदारी खरेदी केली.

जगातील मोठ्या टेक्नॉलॉजी कंपन्यांसोबत सिल्व्हर लेक फर्मच्या भागीदारीचा शानदार रेकॉर्ड राहिला आहे. सिल्व्हर लेक कंपनी टेक्नॉलॉजी आणि फायनान्समध्ये लोकप्रिय आहे. सिल्व्हर लेक टेक्नॉलॉजीमध्ये गुंतवणूक करण्याच्या बाबतीत ग्लोबल लीडर आहे. सिल्व्हर लेकने यापूर्वी अलीबाबा ग्रुप, एअरबीएनबी, डेल टेक्नॉलॉजी, अँट फायनान्शियल , अल्फाबेट व्हॅरिली आणि ट्विटर यांसारख्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांमध्येही गुंतवणूक केली आहे. त्याचबरोबर जिओचा गेल्या सहा आठवड्यांमधील हा सातवा मोठा करार ठरला. कंपनीत या गुंतवणुकीसह गेल्या सहा आठवड्यांमध्ये जगातील विविध आघाडीच्या कंपन्यांकडून एकूण 92,202.15 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे.

Leave a Comment