चित्रदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र तसेच विविध राज्य सरकारांनी आपल्या राज्यात लॉकडाऊन घोषित केलेले आहे. पण या दरम्यान कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच आता कर्नाटकमधील सत्ताधारी भाजपचे आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी एका भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन लॉकडाऊनच्या सगळ्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. या मिरवणुकीत हजारो लोक सहभागी झाले होते. चित्रदुर्ग येथे वेदवती नदीचे पूजन करण्यासाठी आलेल्या आरोग्य मंत्री श्रीरामलू यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. विशेष म्हणजे मिरवणुकीत सहभागी झालेल्या आरोग्यमंत्री श्रीरामलू यांनी मास्क देखील घातला नव्हता.
भाजप मंत्र्याची लॉकडाऊनच्या नियमांना केराची टोपली दाखवत भव्य मिरवणूक
हजारो लोकांनी या मिरवणुकीत भाजपचे झेंडे हातात घेऊन गर्दी केली होती. यावेळी भलामोठा सफरचंदाचा हार त्यांना घालण्यात आला. या दरम्यान ठिकठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजवून पुष्पवृष्टी करण्यात येत होती. फटाकेही मिरवणुकीच्या मार्गावर फोडण्यात आले. अनेक जण श्रीरामलू यांच्या जवळ जावून पुष्पहार देखील घालत होते. नदीचे पूजन करण्यासाठी गेलेल्या श्रीरामलू यांनी भव्य मिरवणुकीत सहभागी होऊन सगळे नियम धाब्यावर बसवल्याबद्दल त्यांच्यावर आता सर्वच स्तरातून टीका होत आहे.