मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या भागात कोरोनाबाधित वाढीच्या प्रमाणात घट


मुंबई : मुंबईला पडलेला कोरोनाचा विळखा अद्याप सैल झाला नसला तरी या कोरोनाची लागण होण्याचा वेग मंदावत चालला आहे. मुंबईत काही दिवसांपूर्वी असलेले दररोज 6.62 टक्के कोरोनाबाधित वाढीचे प्रमाण आता 3.50 टक्क्यांवर आले आहे. त्याचबरोबर ‘हॉटस्पॉट’ ठरलेल्या भायखळा, वरळी, धारावी परिसरांमध्ये रुग्णवाढीचे प्रमाण दहा टक्क्यांवरुन 1.6 ते 2.4 टक्के एवढा खाली आला आहे. विशेष म्हणजे, पालिकेच्या सहा विभाग कार्यालयांच्या हद्दीतही रुग्णवाढीचा दर तीन टक्क्यांपेक्षा खाली उतरला आहे.

कोरोनाने मुंबईत मे महिन्यापासून थैमान घातले होते. त्यामुळे मुंबईतील विभागांमध्ये रुग्णवाढीचा दर आटोक्यात येत नसल्यामुळे मुंबई महानगरपालिकेने अधिक उपाययोजना राबण्यात सुरुवात केली होती. सद्यस्थितीत वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, सायन, सांताक्रुझ, माटुंगा, ग्रँट रोड, ताडदेव, भायखळा या भागांमधील दैनंदिन रुग्णवाढ कमी होत चालली आहे.

सध्या धारावी, दादर, माहिम या भागांतील रुग्णवाढीचा दर 2.4 टक्के एवढा खाली आला आहे. आतापर्यंत मुंबईतील पालिकेच्या सर्व विभागांच्या तुलनेत या भागांत कोरोनाचे सर्वाधिक 3200 रुग्ण सापडले आहेत. पण आता या ठिकाणी रुग्णवाढ कमी झाली आहे. त्याचबरोबर प्रभादेवी भागात रुग्णवाढीचा दर हा 2.2 टक्के एवढा कमी झाला आहे. आतापर्यंत या भागात 2200 रुग्ण सापडले आहेत. ग्रँट रोड आणि कुलाबा विभागातील रुग्णवाढीचा दर हा अनुक्रमे 2.6. आणि 2.7 टक्के एवढा कमी झाल्याचे पालिका आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

तर घाटकोपर, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, मुलुंड व भांडूप या विभागातील रुग्णवाढीचा दर कमी मागील आठवड्याभरापासून कमी होत चालला आहे. सध्या या भागात रुग्णवाढीचा दर 4.5 ते 6.7 एवढा आहे. मुंबईतील पी-उत्तर मालाड विभागात शुक्रवारी सर्वाधिक 7.4 टक्के रुग्णवाढ नोंदवण्यात आली. दहिसर विभागात सुरुवातीला शहरातील अन्य विभागांपेक्षा जास्त रुग्णवाढ होती. ती खाली येत 6.4 टक्के एवढी झाली आहे. घाटकोपरला रुग्णवाढीचा दर 4.5 एवढा आहे. तर पश्चिम उपनगरात मालाड ते दहिसरपर्यंत रुग्णवाढीचा वेग जास्त आहे.

Leave a Comment