पुढच्या वर्षी होणार UPSCची मुख्य परीक्षा


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून यूपीएससी प्रिलिम्स (पूर्व परीक्षा) आणि मेन (मुख्य) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या परीक्षेची तारीख लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यानुसार अखेर परीक्षेची तारीख आयोगाने जाहीर केली आहे. आज आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा आणि मुलाखतीच्या तारखा ठरवण्यासंदर्भात बैठक झाली. पूर्व आणि मुख्य परीक्षेची तारीख या बैठकीत निश्चित करण्यात आली.

केंद्र सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनची घोषणा केल्यानंतर देशातील सर्वच व्यवहार ठप्प झाले. त्याचा परिणाम केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांवरही झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ३१ मे २०१९ रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार होती. पण, ती लॉकडाउनमुळे पुढे ढकलण्यात आल्यानंतर २ जून रोजी ही परीक्षा होणार असल्याचे आयोगाने जाहीर केले होते.

पण, परिस्थितीत सुधारणा न झाल्यामुळे आयोगाने अनिश्चित काळासाठी परीक्षा पुढे ढकलली होती. आता शुक्रवारी (५ जून) या संदर्भात आयोगाची बैठक पार पडली. त्यात तारीख निश्चित करण्यात आली. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आपल्या संकेतस्थळावर शुक्रवारी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या तारखांची घोषणा केली. ४ ऑक्टोबर रोजी पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. तर मुख्य परीक्षा ८ जानेवारी २०२१ रोजी घेण्यात येणार आहे.

Leave a Comment