कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिमसह त्याच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण


नवी दिल्ली – भारताला हवा असलेला कुख्यात गँगस्टर दाऊद इब्राहिम कोरोनाबाधित असल्याचे वृत्त सीएनएन न्यूज १८ ने दिले आहे. दाऊदसोबतच त्याची पत्नीदेखील कोरोनाबाधित असल्याचे पाकिस्तानमधील सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगण्यात येत आहे. दाऊदला कोरोना झाल्यामुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी संभ्रमात पडले असून कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात दाऊदला भरती करण्यात आल्याचे समजते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने ब्रिटनमधील एका न्यायालयाला सध्या पाकिस्तानात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा नसल्याची माहिती दिली होती. पण आता दाऊदला कोरोना झाला असून त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे.

दाऊदला आम्ही आश्रय दिला नसल्याचे पाकिस्तान सांगत असतानाच त्याला आता कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्यामुळे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना दहा दिवसांपूर्वीच दाऊद भेटल्याचेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये तो आल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे आता दाऊदच कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर येत असल्याने मागील काही दिवसांमध्ये तो ज्या-ज्या व्यक्तींना भेटला आहे, त्यांची तपासणी करावी लागणार असल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे. जर का दाऊदला कोरोना झाला असेल तर जगभरामध्ये मोस्ट वॉण्टेड असणाऱ्या दाऊदला पाकिस्ताननेच मागील २५ वर्षांपासून अधिक काळ आसरा दिल्याचे उघड होईल, असे सांगण्यात येत आहे.

दाऊदला कोरोनाचा झाल्याचे वृत्तसमोर आल्यानंतर आता पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. दाऊदला भेटलेल्या व्यक्तींचे कोरोना चाचणीचे निकाल सकारात्मक आले तर पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. असे झाल्यास दाऊद आणि त्याची पत्नी कराचीमध्ये उपचार घेत असल्याचे पाकिस्तानला सांगावे लागले. त्यानंतर राजकीय दबाव वापरुन दाऊदला ताब्यात घेण्यासंदर्भात भारत हालचाली सुरु करु शकतो, असे सांगण्यात येत आहे.

मागील अनेक वर्षांपासून दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे भारताने म्हटले होते. तसेच पाकिस्तानने यासंदर्भात चौकशी करुन दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याची तयारीही अनेकदा केली होती. पण पाकिस्तानने प्रत्येक वेळेस दाऊद आपल्या देशात नसल्याचे सांगत त्याची पाठराखण केली होती. पण आता पाकिस्तानचे पितळे कोरोनामुळे उघडे पडले आहे. दाऊद हा कराचीमधील एका उच्चभ्रू वस्तीत राहत असून येथे पाकिस्तानी सुरक्षा दलाशी संबंधित अधिकारी आणि आयएसआयचे अधिकारी राहतात. त्यामुळेच आता दाऊदला कोरोनाची लागण झाल्यची माहितीसमोर आल्याने पाकिस्तान यासंदर्भात काय स्पष्टीकरण देते हे आगामी काळात स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment