कोट्याधीश फुटबॉलपटूचा सरकारकडून देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीसाठी अर्ज!


जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 67 लाखांच्या पार पोहचली असून या जीवघेण्या व्हायरसमुळे 3 लाख 93 हजार लोकांनी आपले जीव गमावले आहेत. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला असून त्यानंतर सर्वाधिक कोरोनाबाधितांची ब्राझीलमध्ये नोंद झाली आहे. ब्राझीलमधील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 19 हजारांच्या वर पोहचला असल्यामुळे ब्राझीलमधील लॉकडाउन वाढवण्यात आला आहे.

पण या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्यांना सर्वाधिक फटका बसला असून त्यांच्यावर आता उपासमारीची वेळ आली आहे. अशा स्थितीत ब्राझील सरकारने त्यांना 9 हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेतला. पण, यामध्ये क्रीडा विश्वातील सर्वात श्रीमंत फुटबॉलर नेमारने देखील अर्ज केल्याचे समोर आले आहे, त्याचबरोबर त्याच्या अर्जानुसार 120 अमेरिकी डॉलर, म्हणजे 9 हजार रुपयांच्या कल्याणकारी देयकास मान्यता देखील देण्यात आली आहे.

नेमार, हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा तिसरा फुटबॉलर आहे. पण यामागील सत्य काही वेगळेच आहे. त्याची जन्मतारीख आणि त्याच्या ब्राझिलियन आयडी नंबरचा उपयोग करून फेडरल सरकारकडून 600-रिअल उत्तेजनाच्या पेमेंटसाठी नोंदणी करण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती माहिती न्यूज साइट यूओएलने (UOL) दिली आहे. आपत्कालीन निधी अनौपचारिक क्षेत्रात काम करणार्‍यांना, जसे की क्लिनर किंवा कुक यांना मदत म्हणून जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार लॉकडाऊनमध्ये नेमारने इंस्टाग्राम पोस्टद्वारे तब्बल 11.4 कोटी रुपयांची कमाई केली आहे. इंस्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत नेमार तिसऱ्या स्थानावर आहे.

Leave a Comment