मुंबई महापालिकेचा खुलासा; ‘बीकेसी’तील जम्बो रुग्णालयाबद्दलची माहिती खोटी


मुंबई – राज्यातील आणि विशेषतः मुंबईत होणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भावाचा वेग लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य सरकारने युद्धपातळीवर रुग्णालये उभारण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार एक हजार खाटांची क्षमता असलेले जम्बो रुग्णालय मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलाच्या मैदानावर उभारण्यात आले आहे. कालच्या चक्रीवादळाचा फटका या रुग्णालयाला बसल्याची खोटी माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात येत असून त्यावर आता बृह्नमुंबई महापालिकेने खुलासा केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर एक हजार बेडची सुविधा असलेले जम्बो कोविड रुग्णालय वांद्रे-कुर्ला संकुलाच्या (बीकेसी) मैदानावर उभारण्यात आले. काही रुग्णही या रुग्णालयात दाखल झाले होते. पण काल मुंबईत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याने तेथील रुग्णांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळाने काल कोकण किनारपट्टीसह इतर काही भागात प्रचंड विध्वंस केला. पण हे वादळ सुदैवाने मुंबईत आले नाही. पण बीकेसीतील रुग्णालयाचे या वादळामुळे प्रचंड नुकसान झाल्याची माहिती सोशल मीडियातून पसरवण्यात येत होती.


बृह्नमुंबई महानगरपालिकेने अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याविषयी रुग्णालयाचे फोटो शेअर करुन खुलासा केला आहे. बीकेसीत उभारण्यात आलेल्या जम्बो कोविड रुग्णालयाला निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसल्याचा दावा करत अफवा पसरवल्या जात आहे. त्या खोट्या असून रुग्णालयाच्या कुंपणाचे वादळामुळे फक्त थोडे नुकसान झाले आहे. रुग्णालय व्यवस्थित असून, सायंकाळपासून पुन्हा सुरू करता येऊ शकते, असा खुलासा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे.


दरम्यान निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर बीकेसीच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या रुग्णालयाचे व्हिडीओ भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी शेअर केले होते. त्याचबरोबर रुग्णालयाचे मोठे नुकसान झालं असून करदात्यांच्या पैशांचा गैरवापर केल्याचा आरोपही त्यांनी राज्य सरकारवर केला होता.

Leave a Comment