बिहार सरकारकडून होम क्वारंटाईन असलेल्या कामगारांमध्ये मोफत कंडोमचे वाटप


पटना – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील विविध राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना केंद्र सरकारने आपआपल्या राज्यात परतण्याची परवानगी दिल्यानंतर, टप्प्या टप्प्याने मजूर आपआपल्या गावी परतू लागले आहेत. उत्तर प्रदेश, बिहारचे अनेक मजूर महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान यासारख्या राज्यांमधून आपल्या घरी परतत आहेत. स्थानिक राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने इतर राज्यांमधून आपल्या घरी परतलेल्या बिहारमधील कामगारांसाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला आहे. बिहार सरकार १४ दिवसांच्या होम क्वारंटाइन काळात मजुरांना मोफत कंडोमचे वाटप करणार आहे.

इतर राज्यातून बिहारमध्ये आल्यानंतर प्रत्येक कामगार व मजुरांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्यात आले होते. पुढचे काही दिवस खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना होम क्वारंटाइन करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. अनावश्यक गर्भधारणा होण्याची या काळात शक्यता असते. आम्ही यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन करत आहोत. तसेच आरोग्य विभागातर्फे त्यांना मोफत कंडोमही वाटत असल्याची माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेला आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली. आतापर्यंत बिहारमधील ८ लाखापेक्षा जास्त लोकांनी क्वारंटाइन सेंटरमध्ये १४ दिवसांचा कालावधी पूर्ण करत आपल्या घरी जाणे पसंत केले आहे. तर बिहारमध्ये अजुन साडेपाच लाखांपेक्षा जास्त लोक क्वारंटाइनमध्ये आहेत. यावर स्पष्टीकरण देताना आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की कामगारांना मोफत कंडोमचे वाटप कुटुंब नियोजनासाठी करण्यात येत असून कोरोनाच्या प्रादुर्भावाशी त्याचा कसलाही संबंध नाही. बिहार सरकार यासाठी काही सामाजिक संस्थांचीही मदत घेत असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

Leave a Comment