रशियाने दिली गोड बातमी; चार दिवसात रुग्ण कोरोनामुक्त झाल्याचा निष्कर्ष


नवी दिल्ली – कोरोना व्हायरसवर प्रभावी ठरणारे एक औषध रशियाने विकसित केले असून रशियामध्ये कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर या औषधाचा पुढच्या आठवडयापासून वापर सुरु होणार आहे. हे औषध वापरण्यास रशियाच्या आरोग्य यंत्रणेने मंजुरी दिली असून यासंदर्भातील वृत्त रॉयटर्सने दिले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण या नव्या औषधामुळे कमी होईल त्याचबरोबर विस्कटलेली आर्थिक घडी रुळावर येऊन जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे.

औषधाची एविफेविर या नावाने नोंदणी झाली असून रशियन रुग्णालयांमध्ये याच महिन्याच्या ११ तारखेपासून कोरोना रुग्णांवर या अँटीव्हायरल औषधाने उपचार सुरु होणार आहेत. यासंदर्भातील माहिती रशियाच्या आरडीआयएफ प्रमुखाने रॉयटर्सला दिली आहे. महिन्याला ६० हजार रुग्णांवर उपचार करता येतील, इतक्या प्रमाणात एविफेविर औषध बनवणारी कंपनी औषध बनवणार आहे.

सध्या कोरोना व्हायरसचा फैलाव रोखणारी कुठलीही लस उपलब्ध नाही. त्याचबरोबर आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या काही औषधांच्या चाचण्या सुरु असून काही औषध प्रभाव सुद्धा ठरत आहेत. तसेच कोरोनावरील उपचारांमध्ये अमेरिकेतील गिलीयड सायन्सेस या कंपनीने बनवलेले रेमडेसिविर हे अँटीव्हायरल औषधही प्रभावी ठरत आहे.

फॅव्हीपीरावीर म्हणून देखील एविफेविर हे औषध ओळखले जाते. जपानी कंपनीने या औषधाची निर्मिती १९९० साली केली होती. फॅव्हीपीरावीर या औषधाची निर्मिती जपानमधील फुजीफिल्म होल्डींग कॉर्पोरेशन एविगन या ब्रॅण्डनेमखाली करते. ताप, सर्दीवर असलेल्या फॅव्हीपीरावीर या औषधाचा जपानमध्ये वापर केला जातो.

फॅव्हीपीरावीर हे मूळ जपानी औषध असून रशियन शास्त्रज्ञांनी त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी त्यामध्ये काही बदल केले आहेत. रशियाकडून पुढच्या दोन आठवडयात बदल करुन बनवण्यात आलेल्या या औषधाबद्दल जगाला माहिती दिली जाईल असे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले. रशियातील ३३० कोरोनाग्रस्तांवर या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या. बुहतांश केसेसमध्ये रुग्ण हे चार दिवसात पूर्णपणे बरे झाल्याचे दिसून आल्याचे आरडीआयएफच्या प्रमुखांनी सांगितले.

Leave a Comment