सर्वसाधारणपणे सशाचा आकार अगदीच लहान असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर चक्क कुत्र्याच्या आकाराच्या सशाचे फोटो व्हायरल होत आहे. हा ससा इंस्टाग्रामवर स्टार आहे. इंस्टाग्रामवर या सशाचे कोको पफ नावाने अकाउंट असून, येथे त्याचे 2 लाखांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.
हा ससा वॉशिंग्टनच्या सीएटल शहरात राहतो. हा एक प्रशिक्षित ससा आहे. म्हणजे ज्या प्रमाणे कुत्रे अथवा मांजर लोकांचे ऐकतात, तसेच हा ससा देखील त्याच्या मालकाचे ऐकतो. या सशाला सांभाळणाऱ्या लिंडसे म्हणाल्या की, भाड्याच्या घरात राहत असल्याने आम्ही कुत्रा अथवा मांजर पाळण्याऐवजी ससा पाळण्याचा निर्णय घेतला. मुलगी मेसीला प्राणी खूप आवडतात. आम्हाला एक पाळीव प्राणी हवा होता. त्यामुळे आम्ही ससा पाळण्याचा निर्णय घेतला.
लिंडसे यांनी सांगितले की, कोकोला नवीन जाग्यावर रुळण्यास थोडा वेळ लागतो. हे कुटुंब या सशाची खूप काळजी घेते. प्रत्येक वेळी फिरायला जाताना त्याला सोबत घेऊन जाते. या सशाचे जेवण देखील भरभक्कम आहे. तो दोन मोठ्या प्लेट भरून हिरव्या भाजा खातो. त्याला केळी आणि आंबा आवडतो. या सशाला काही वाईट सवयी देखील आहेत. तो त्यांच्या घरातील मोबाईल चार्जर, कॉम्प्युटरच्या तारा कुरतडत असतो.