पोलीस प्रमुखांनी भरला ट्रम्प यांना दम, म्हटले Please, keep your mouth shut!


वॉशिंग्टन – एका कृष्णवर्णीय नागरिकाच्या मृत्युनंतर अमेरिकेत हिंसाचार भडकला असून त्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी लुटालूट, जाळपोळ सुरू असून अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये त्यापार्श्वभूमीवर संचारबंदी देखील घोषित करण्यात आली आहे. या दरम्यान, ट्रम्प यांच्या हिंसेवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याच्या टीकेवर एका पोलीस प्रमुखाने त्यांना तोंड बंद (Please, keep your mouth shut) ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाइम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा हिंसाचार अमेरिकेतील काही शहरांमध्ये उफाळला आहे. व्हाईट हाऊसपर्यंत शुक्रवारपासून सुरू असलेल्या या हिंसाचाराची धग पोहोचली. तेथील परिस्थिती इतकी बिघडली की संरक्षणासाठी नेमलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना संरक्षित बंकरमध्ये घेऊन गेले होते. सुदैवाने तिथे पोहोचलेल्या वॉशिंग्टन पोलिसांनी आंदोलकांना तिथून पिटाळून लावले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.

यानंतर अमेरिकेतील नागरिकांना संरक्षण पुरवण्याचे ट्रम्प यांनी आदेश दिले आहेत. जर कोणतेही राज्य किंवा शहर त्याच्या नागरिकांच्या आणि त्यांच्या संपत्तीच्या संरक्षणाला नकार देत असेल, तर तिथे मी अमेरिकन सैन्य उतरवून त्यांचे काम सोपे करेन, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. ह्युस्टनचे पोलीस प्रमुख आर्ट एक्वेडो यांनी ट्रम्प यांच्या या विधानानंतर त्यांना तोंड बंद ठेवा, असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, देशाचा पोलीस प्रमुख या नात्याने मी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना फक्त एवढेच सांगू इच्छितो की, तुमच्याकडे जर चांगले बोलण्यासाठी काहीही नसेल तर कृपया तुमचे तोंड बंदच ठेवा, अशा शब्दांत सुनावले आहे.

कृष्णवर्णीय अमेरिकन नागरिकांवर पोलिसांकडून होणारे अत्याचार नेहमीच तणावाचा विषय राहिले आहेत आणि या प्रकरणामुळे पुन्हा एकदा या घटनांविषयीची खदखद उफाळून आली आहे. तीन पोलीस अधिकाऱ्यांना या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे. तर डेरेक शॉविन या 44 वर्षीय श्वतेवर्णीय अधिकाऱ्याला अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शॉविन यांना आता न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Leave a Comment