ठाकरे सरकारचे ‘मिशन बिगीन अगेन’, तीन टप्प्यांत सुरू करणार राज्यातील अनेक गोष्टी


मुंबई – देशात सुरु असलेला लॉकडाउन ३० जूनपर्यंत वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारने केल्यानंतर आता ३० जून पर्यंत संपूर्ण राज्यात देखील लॉकडाउन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण हे करत असताना ठाकरे सरकारने नवी सुरूवात करण्यासाठी ‘मिशन बिगीन अगेन’ हे नवे धोरणही राबवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता राज्यातील अनेक गोष्टी तीन टप्प्यात सुरू करण्यात येणार आहेत.

राज्य सरकारने चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनमध्ये रेड झोन वगळता इतर ठिकाणी अनेक सेवा सुरू करण्याची परवानगी दिली होती. पण आता रेड झोनमध्ये येणाऱ्या महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. पण लॉकडाउनचे कडक पालन कंटेन्मेंट झोनमध्ये केले जाणार असून, त्याठिकाणी कोणतीही सूट सध्या तरी देण्यात आलेली नाही.

मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर या महापालिका रेड झोनमध्ये असून आता ठिकाणाच्या अनेक गोष्टी आता टप्प्या-टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.

ठाकरे सरकारच्या मिशन बीगिन अगेनचा पहिला टप्पा ३ जूनपासून सुरू होणार असल्यामुळे ३ जूनपासून अनेक गोष्टी सुरू होणार आहेत. त्यानुसार सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसतील. बीच, सरकारी-खासगी मैदाने, सोसायट्यांचे मैदाने, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असेल. पण हे केवळ सकाळी ५ ते संध्याकाळी ७ याच काळात करता येईल. समूहाने कोणतीच कृती करता येणार आहे. लहान मुलांसोबत एका मोठ्या व्यक्तिला राहता येईल.

तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना कामाला सुरूवात करता येईल. त्याचबरोबर गॅरेजेस देखील सुरू करता येतील. पण गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल. तसेच अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येईल.

५ जूनपासून मिशन बीगिन अगेनचा दुसरा टप्पा सुरू होणार असून यामध्ये दुकानांना परवानगी देण्यात आली असून त्यानुसार सर्व दुकाने सुरू करण्यास ५ जूनपासून परवानगी असेल. पण, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नसेल. परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे पी1 आणि पी2 असा. म्हणजेच रस्त्याच्या/लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. परंतु त्यांना केवळ सकाळी ९ ते संध्याकाळी ५ याच काळात दुकाने सुरू ठेवता येतील.

तसेच कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नसेल. कारण त्यातून कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका आहे. शिवाय कोणत्याही प्रकारच्या कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नसेल. लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे. शक्यतो जवळच्याच दुकानांचा वापर करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. शिवाय, यासाठी वाहनही वापरता येणार नाही. सोशल डिस्टंन्सिंगचा वापर एखाद्या मार्केटमध्ये केला जात नसल्याचे आढळल्यास, ते मार्केट अथवा दुकान तात्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.

त्याचबरोबर ५ जूनपासून टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही परवानगी असेल. पण त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन असेल. म्हणजेच चालक अधिक दोन प्रवासी घेऊन आता टॅक्सी, कॅब आणि रिक्षा सुरू करता येतील. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असेल. पण दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येईल.

मिशन बीगिन अगेनचा तिसरा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यात खासगी कार्यालयांना काही अंशी परवानगी देण्यात येणार आहे. त्यानुसार ८ जूनपासून खासगी कार्यालयांना कामास सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. पण कामाच्या ठिकाणी केवळ १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. ऑफिसमध्ये जे कर्मचारी येतील त्यांनी सॅनिटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आपश्यक आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment