नासा आणि स्पेसएक्सने रचला इतिहास


फ्लोरिडा: स्पेसएक्स या खासगी कंपनीच्या यानातून जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकेचे अंतराळवीर ‘स्पेस स्टेशन’च्या दिशेने रवाना झाले असून ही मोहीम अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि स्पेसएक्स यांनी संयुक्तपणे राबवली आहे. यानिमित्ताने अमेरिकेचे अंतराळवीर तब्बल ९ वर्षांनतर अंतराळात गेले आहेत.

अमेरिकेचे २ अंतराळवीर स्पेसएक्सच्या फाल्कन ९ या खासगी रॉकेटमधून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या (स्पेस स्टेशन) दिशेने रवाना झाले. फ्लोरिडातील केप कॅनरवल येथील जॉन एफ केनेडी अंतराळ संशोधन केंद्रातून या मोहिमेसाठी रॉकेटचे उड्डाण झाले. हे उड्डाण भारतीय वेळेनुसार रविवारी रात्री १ वाजता झाले. प्रतिकूल हवामानामुळे उड्डाणाला ३ दिवसांचा विलंब झाला. ड्रॅगन कॅप्सुल आणि फाल्कन ९ या खासगी रॉकेटचे व्यवस्थित उड्डाण झाले.

तब्बल ९ वर्षांनंतर अमेरिकेने माणसासह रॉकेट अंतराळात पाठवले आहे. याआधी अमेरिकेने २०११ मध्ये अंतराळवीरांना अंतराळात पाठवल्यानंतर नासाने तब्बल ९ वर्षांनी अंतराळ स्थानकावर अंतराळवीर पाठवले आहेत. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने ही मोहीम व्यवस्थित पार पडल्याची माहिती नासाचे प्रशासक जिम ब्राइडेनस्टीन यांनी ट्विट करुन दिली. नासा आणि स्पेसएक्स यांनी संयुक्तपणे यशस्वी मोहीम राबवली म्हणून मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांचेच त्यांनी कौतुक केले. मला मोहिमेत सहभागी झालेल्यांचा अभिमान वाटतो, असेही त्यांनी म्हटले. एका खासगी कंपनीच्या सहकार्याने या निमित्ताने पहिल्यांदाच अंतराळात माणूस पाठवण्याचा एक यशस्वी प्रयोग झाला आहे. यातून भविष्यात आणखी अनेक संधी निर्माण होण्याची शक्यता आहे.


१९ तासांचा प्रवास करुन रॉबर्ट बेहेनकेन आणि डगलस हर्ले हे अंतराळवीर अंतराळ स्थानकात पोहोचतील. २० वर्षांपूर्वी २०००मध्ये या मोहिमेसाठी त्यांची निवड झाली होती. त्यांना यानातून प्रवास करण्यासाठी तसेच नवे तंत्रज्ञान हाताळण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. हे अंतराळवीर स्पेसएक्सच्या ड्रॅगन कॅप्सुल (स्पेसक्राफ्ट ड्रॅगन) या यानातून अंतराळ स्थानकावर जाणार आहेत. यानाने फाल्कन ९ रॉकेटच्या मदतीने ठरल्याप्रमाणे व्यवस्थित उड्डाण केले आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती अॅलन मस्क यांची स्पेसएक्स ही कंपनी असून अंतराळ क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी त्यांनी या कंपनीची स्थापना केली आहे.

स्पेसएक्ससोबतच्या मोहिमेच्या निमित्ताने जास्तीत स्वयंचलित यंत्रांची चाचपणी करण्याचा निर्णय नासाने घेतला आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास भविष्यात खासगी कंपन्यांच्या सहकार्याने नासा आणखी मानवी मोहिमा राबवू शकेल. स्वयंचलित यंत्र यात संशोधनाचे बरेचसे काम करतील आणि संशोधक यानात बसून निरिक्षणांच्या आधारे निष्कर्ष काढू शकतील. मर्यादीत कालावधीसाठी नासा-स्पेसएक्स यांच्या संयुक्त मोहिमेत अंतराळवीर आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानकाच्या दिशेने रवाना झाले आहेत. हे अंतराळवीर विशिष्ट उद्दीष्ट पूर्ण झाल्यावर पुन्हा यानातून पृथ्वीवर परतणार आहेत. अंतराळ पर्यटन हा एक नवा पर्याय या निमित्ताने जगासाठी खुला होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment