अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरण; अखेर सत्यशील शेरकर यांच्याविराधोत गुन्हा दाखल


पुणे – सोशल मीडियावर जुन्नरमधील अक्षय बोऱ्हाडे या तरुणास मारहाण केल्याच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर याप्रकरणी आता जुन्नर पोलिसांनी सत्यशील शेरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर मनोरुग्ण, गरीब तसेच निराधार लोकांसाठी काम करणाऱ्या शिवऋण प्रतिष्ठानच्या अक्षय बोऱ्हाडे नामक तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला होता. अक्षय बोऱ्हाडेने सत्यशील शेरकर यांनी त्यांच्या बंगल्यावर बोलवून मला मारहाण केली, तसेच बंदुकीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला होता. त्याने याची माहिती फेसबुक लाईव्हद्वारे दिली होती.

दरम्यान, अक्षयने केलेल्या आरोपानंतर विविध क्षेत्रातून त्याचबरोबर शिवभक्तांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. त्याचबरोबर आमदार अतुल बेनके आणि खासदार अमोल कोल्हे यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालण्याची मागणी जोर धरु लागली होती.

दरम्यान अक्षयला खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पाठिंबा देत त्याला मारहाण करणाऱ्यांवर योग्य कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर काल गुन्हा दाखल करण्यात आला असून, याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, अक्षयच्या कामाचे मलाही कौतुकच आहे, पण अक्षयने आरोप केलेले सत्यशील शेरकर आणि मी, आम्ही दोघेही समाजकारणात येण्याअगोदरपासूनच चांगले मित्र आहोत. सत्यशील शेरकरांनादेखील मी जवळून ओळखतो. तरी या प्रकरणी जर कोणावर अन्याय झाला असेल, तर कोणालाही पाठिशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. या प्रकरणी संबंधित पोलिसांना सखोल चौकशीचे आदेश मी याआधीच दिल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment