कौन बनेगा करोडपती ज्युनियर विजेता बनला आयपीएस अधिकारी

फोटो साभार जागरण

कौन बनेगा करोडपती मधील एका विजेत्याची कथा सध्या विशेष चर्चेत असून त्याने २००१ मध्ये स्पेशल केबीसी ज्युनियर स्पर्धा जिंकली होती. त्यावेळी १४ वर्षाचा असलेल्या रवी मोहन सैनी याने सर्व १५ प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन १ कोटी रुपये जिंकले होते. या घटनेला आता २० वर्षे होत आली असून आज हाच रवी आयपीएस बनला आहे आणि त्याची पोस्टिंग गुजरात पोरबंदर येथे आहे.

कौन बनेगा करोडपती या शोने अनेकांचे आयुष्य बदलले. जिंकलेली रक्कम अनेकदा चर्चेची ठरली आणि त्यामुळे या लोकांच्या वाट्याला प्रसिद्धीही आली. या संदर्भातल्या अनेक मनोरंजक कथा ऐकायला मिळतात. त्यातील एक रवी मोहन सैनी. ३३ वर्षीय रवी पोरबंदर येथे एसपी म्हणून कार्यरत आहे.

रवीने म. गांधी मेडिकल कॉलेज जयपूर येथून एमबीबीएस पदवी मिळविली आणि इंटर्नशिप सुरु असतानाच त्याची युपीएससी मध्ये निवड झाली. त्याचे वडील नेव्ही मध्ये आहेत. त्यामुळे रवीने आयपीएस ची निवड केली. २०१४ मध्ये तो देशात ४६१ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. सध्या रवी पोरबंदर येथे कोविड साथीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेखोरपणे करण्यास प्राधान्य देत आहे.

सध्या केबीसीचा १२ वा सिझन सुरु असून अमिताभ बच्चन यांनी एका व्हिडीओ मध्ये ही घोषणा केली आहे. केबीसीची सुरवात २००० मध्ये झाली. सुरवातीची बक्षीस रक्कम १ कोटी होती. दुसऱ्या, तिसऱ्या सिझन मध्ये ती २ कोटी झाली चौथ्या सिझन मध्ये १ कोटी बक्षीस आणि ५ कोटीचा जॅकपॉट असे त्याचे स्वरूप बदलले. सिझन ९ मध्ये १६ प्रश्न आणि ७ कोटी बक्षीस असे त्याचे स्वरूप होते.

Leave a Comment