‘कोरोना वॉरिअर्स’ डॉक्टरांच्या सेवेसाठी असलेल्या ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये भीषण आग


मुंबई : काल रात्री (27 मे) मुंबईतील मरिन लाईन्सच्या परिसरात ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये भीषण आग लागली होती. 30 कोरोना वॉरिअर्स डॉक्टर या आगीतून थोडक्यात बचावले. अग्निशमन दलाला हॉटेलमधील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मरिन लाईन्समधील धोबी तलावाजवळ असलेल्या ‘फॉर्च्युन हॉटेल’मध्ये जेजे हॉस्पिटलमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणाऱ्या काही डॉक्टरांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. सर्व डॉक्टरांना या दुर्घटनेतून सुखरुप वाचवण्यात आले असून त्यांची व्यवस्था अन्य ठिकाणी करण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्या 10 ते 12 गाड्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाल्या. हॉटेलमध्ये अडकलेल्या 30 डॉक्टरांची सुटका करण्यात आली. आगीवर फायर ब्रिगेडकडून आगीच्या कूलिंगचे काम करण्यात येत होते. फॉर्च्युन हॉटेलच्या इमारतीच्या दुसर्‍या मजल्यावर रात्रीच्या वेळी आग लागली. ही आग वेगाने चौथ्या मजल्यापर्यंत पसरली. आगीमुळे काही काळ घबराट पसरली होती. धुरामुळे दृश्यमानताही कमी झाली होती. परंतु सर्वांची सुखरुप सुटका करण्यात अग्निशमन दलाला यश आले. आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Comment