गुलाबराव पाटलांचे विरोधकांना आव्हान; हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा


जळगाव : राज्यावर कोरोनासारखे भयाण संकट ओढावलेले असतानाच या कोरोनावरून राज्यातील राजकारण कमालीचे तापत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत विरोधकांकडून सरकारवर आरोपाच्या फैरी झाडण्यात येत आहेत. त्यातच आता शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी भाजप नेत्यांना कोरोनाचे संकट संपल्यावर मैदानात या आणि हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे आव्हान दिले आहे.

कोरोनासारख्या महामारीशी राज्य सरकार लढा देत असताना विरोधक हे घाणेरडे राजकारण करत असल्याचा आरोपही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. सोबतच राज्यातील सरकार स्थिर असून सरकार पडणार असल्याच्या अफवा देखील विरोधकांकडून पसरवल्या जात असल्याचेही ते म्हणाले आहेत. गुलाबराव पाटील जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते. सध्या कोरोनावरुन विरोधात असलेल्या भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असून शाब्दिक चकमक रंगली आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर दिल्यानंतर भाजप नेत्यांनीही उत्तर देण्यास सुरुवात केली असून आरोप-प्रत्यारोप तसेच आव्हानांची मालिकाच सुरु झाली आहे.

कोरोनासारख्या कठीण काळात विरोधकांकडून महाविकास आघाडीचे सरकार पाडणार असल्याची चर्चा रंगवली जात आहे. उगाच संभ्रम निर्माण केला जात आहे. मध्यप्रदेशात ज्या पद्धतीने वातावरण निर्माण करण्यात आले होते, त्याच पद्धतीने महाराष्ट्रात वातावरण निर्मिती सुरु असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

राज्य सरकार कोरोना विरोधातील लढाईत सर्वतोपरी प्रयत्न करत असून विरोधकांकडून होणारे आरोप चुकीचे आहेत. उद्धव ठाकरेंना विरोधकांनी सल्ला देण्याऐवजी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना सल्ला द्यावा. मासा पाण्यातून बाहेर काढल्यानंतर ज्या पद्धतीने तडफडतो, त्याच पद्धतीने विरोधक सत्ता गेल्यामुळे तडफडत असल्याचा टोलाही गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना लगावला.

Leave a Comment