चीनच्या कुरापतीमुळे सीमेवर तणाव, मोदींची तिन्ही लष्करप्रमुखांसोबत बैठक


नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसोबत सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लद्दाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांकडून या सध्याच्या परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्याय मागवले आहेत. लद्दाखमधील परिस्थितीबाबत पंतप्रधानांना तिन्ही सैन्यदलाकडून एक अहवाल देखील देण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालदेखील या बैठकीत उपस्थित होते.

लद्दाख सीमारेषेपलीकडून चीनकडून सुरु कुरापतींमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाला आहे. दरम्यान आपल्या सैन्याला तयार राहण्याचे चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांनी आदेश दिले आहेत. भारताकडून देखील या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा घेतला जात आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील कालच बैठक घेतली होती.

सध्याच्या परिस्थितीबाबत पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत तिन्ही दलांकडून देण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये जवळ असलेले डिफेंस असेट्स आणि तणाव वाढल्याच्या स्थितीनंतर रणनीती काय असावी? याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. तिन्ही दलांकडून आपापल्या तयारीबाबतच्या ब्लूप्रिंट देखील पंतप्रधानांना सोपवल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि लष्करप्रमुख बिपिन रावत यांच्याकडून याबाबत माहिती घेतली आहे.

लद्दाख सीमारेषेपलीकडून चीनकडून वारंवार सुरु असलेल्या हालचालीमुळे भारत-चीन यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान सीमेलगत चीनकडून होणाऱ्या हालचालीच्या पार्श्वभूमीवर भारताने आक्रमक पवित्रा घेतला आहे. लद्दाखमधील गलवा आणि पेंगोंग त्सो परिसरात अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारताचे वरिष्ठ सैन्य अधिकारी सीमारेषेवर बारिक लक्ष ठेवून असल्याची माहिती आहे.

चीनने गेल्या महिन्याभरात भारताच्या सीमेत अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे. काही चीनचे सैनिक 3 ते 4 किलोमीटर आतपर्यंत आले होते. भारताने चीनचे हे नापाक प्रयत्न हाणून पाडले आहेत. तसेच सीमाभागातील रस्ते बांधणी व इतर कामे सुरूच ठेवली आहेत. यातील अनेक प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर असल्यामुळेच सैरभैर झालेल्या चीनने भारताविरोधात कुरापती सुरु केल्या आहेत. लद्दाखमध्ये 6-7 मे च्या दरम्यान चीन आणि भारतीय सैन्यात झटापट देखील झाली होती. यात काही सैनिक जखमी झाले होते, अशी देखील माहिती आहे.

Leave a Comment