अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या एक लाखावर


मुंबई : जगभरातील बहुतांश देश जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे हतबल झाले असून जगभरात आतापर्यंत 56 लाखांहून अधिक कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे. जगातील 213 देशांमध्ये मागील 24 तासात 91,940 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4,055 जणांचा मागील 24 तासात कोरोनामुळे बळी गेला आहे. या संदर्भात वर्ल्डोमीटरने दिलेल्या आकडेवारीनुसार जीवघेण्या कोरोना व्हायरसची जगभरात 55,87,582 लोकांना लागण झाली असून आतापर्यंत कोरोनाने जगभरात 3 लाख 51 हजार 668 लोकांचा बळी घेतला आहे. विशेष म्हणजे जगभरातील 24 लाख 26 हजार 560 लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. जगातील 74 टक्के कोरोनाबाधित हे केवळ बारा देशांमध्येच आहेत. या बारा देशांमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 42 लाखांच्या घरात आहे.

वर्ल्डोमीटरच्या आकडेवारीनुसार भारत रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत जगात दहाव्या स्थानावर आहे. भारतात कोरोनाचे 1,50,793 रुग्ण आहेत. तर कोरोनामुळे 4,344 बळी गेले आहेत. सध्या भारतात 82,172 अॅक्टिव्ह केसेस असून आतापर्यंत 64,277 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे.

अमेरिकेला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. जगात जवळपास एक तृतीयांश कोरोना केसेस तर एक तृतीयांश मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेत 17,25,155 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 1,00,580 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर यूकेमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. यूकेत 37,048 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर तिथे कोरोनाबाधितांची संख्या 2,65,227 एवढी आहे. अमेरिकेनंतर ब्राझील कोरोनाबाधितांच्या आकड्यांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. ब्राझीलमध्ये 3,92,360 कोरोनाबाधित आहेत तर 24,549 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 27,117 लोकांचा मृत्यू झाला आहे. 2,83,339 लोकांना स्पेनमध्ये कोरोनाची लागण झाली. कोरोनाच्या मृत्यूंच्या आकड्यात इटली तिसऱ्या क्रमांकावर आहे. इटलीत आतापर्यंत 32,955 मृत्यू झाले आहेत. तर कोरोनाबाधितांचा आकडा 2,30,555 एवढा आहे.

अमेरिका, जर्मनी,स्पेन, फ्रांस, टर्की, इराण, रशिया, ब्राझिल, यूके, इटली, भारत आणि पेरु हे बारा देश असे आहेत ज्या देशांमध्ये कोरोना बाधितांचा आकडा हा एक लाखांच्या वर गेला आहे. तर अमेरिका, स्पेन, इटली, फ्रांस, ब्रिटन, ब्राझील या सहा देशांमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू कोरानामुळं झाला आहे. एकट्या अमेरिकेत हा आकडा एक लाखांच्या वर गेला आहे.

Leave a Comment