1 जूनपासून उघडणार कर्नाटकातील मंदिरे


बंगळुरू – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सध्या चौथा टप्पा सुरु असून या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून बऱ्याच नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली होती. त्याचबरोबर राज्य सरकारदेखील परिस्थितीनुसार निर्णय घेऊ शकतील, असे अधिकार देखील दिले होते. लॉकडाऊन दरम्यान अनेक धार्मिकस्थळे ही बंदच ठेवण्यात आली होती. पण आता राज्य सरकारला दिलेल्या अधिकाराचा वापर कर्नाटक सरकार करणार आहे. त्यानुसार आता कर्नाटक सरकारने मंदिरांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 जूनपासून मंदिरे उघडण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. पण या काळात सामाजिक अंतराचे अनुसरण करणे आवश्यक असणार आहे. गेले अनेक दिवस कर्नाटकात मंदिरातील पुजारी आणि भक्त मंदिर उघडण्याची मागणी करत होते.

कर्नाटकमधील जवळपास 34,500 मंदिरे 1 जूनपासून भाविकांसाठी उघडली जातील. यापूर्वी उत्तराखंडमध्ये बद्रीनाथ आणि केदारनाथ धामचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत. पण लॉक डाऊनमुळे भाविकांना तेथे जाण्याची परवानगी नाही. कर्नाटकचे मंत्री के. श्रीनिवास पुजारी यांनी सांगितले की, 1 जूनपासून राज्यातील मंदिरे जनतेसाठी उघडली जातील, यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील.

कर्नाटकच्या 52 मंदिरांमध्ये आजपासून ऑनलाइन सेवा बुकिंग सुरू होईल. त्याचबरोबर 31 मे पर्यंत मंदिरे उघडण्यासाठी सर्व तयारी करण्यात येणार आहे. मंदीर पूजेसाठी आणि दैनंदिन प्रार्थनेसाठी उघडतील असे मंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, मंदिरांमध्ये जत्रा आणि कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, लॉकडाऊनचा परिणाम देशातील सर्वात श्रीमंत मंदिरावरही झाला आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिरात कार्यरत 1300 कंत्राटी कामगारांना काढून टाकण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांचा करार 30 एप्रिल रोजी संपला होता आणि मंदिर प्रशासनाने 1 मेपासून कराराचे नूतनीकरण करण्यास नकार दिला.

Leave a Comment