दहावीच्या रद्द करण्यात आलेल्या परीक्षांच्या विषयांच्या गुणदानासंदर्भात निर्णय जाहीर


पुणे – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात घोषित करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या मार्च 2020 च्या इयत्ता दहावी परीक्षेच्या सामाजिक शास्त्र पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात होत्या. आता या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने प्रकटनाद्वारे माहिती दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020 इयत्ता दहावीच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या. पण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार 23 मार्च 2020 रोजी सकाळी 11 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आलेला सामाजिक शास्त्र पेपर-2 (भूगोल) या विषयाची लेखी परीक्षा आणि त्यानंतर आयोजित करण्यात आलेली दिव्यांग विद्यार्थांच्या कार्यशिक्षण या विषयांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा रद्द केलेल्या विषयांना आता पुढीलप्रमाणे गुणदान करण्यात येणार आहे.

सामाजिक शास्त्र पेपर-2(भूगोल) या विषयाचे गुणदान हे विद्यार्थ्याने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्यांनी अन्य विषयांच्या लेखी,तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेवून, त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे. या विषयांच्या परीक्षेसाठी गुणदान करून वरीलप्रमाणे निकाल जाहीर केले जाणार असल्याचे राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी कळवले आहे.

Leave a Comment