‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’; वुहान लॅबमधील बॅट वूमनचे खळबळजनक वक्तव्य


नवी दिल्ली – चीनच्या वुहानमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील 213 देशांमध्ये अक्षरशः थैमान माजवले आहे. या जीवघेण्या व्हायरसची जगभरातील आजपर्यंत 56 लाख लोकांना लागण झाली आहे, तर जवळपास साडे तीन लाखाहूनही अधिक लोक आपल्या जीवाला मुकले आहेत. या व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक देशांनी लॉकडाऊन लागू केले आहे. पण या लॉकडाऊनमुळे अमेरिका, रशिया, ब्रिटन, भारत यासारख्या बड्या देशांचे जनजीवन आणि अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. पण कोरोना हा फक्त एक ट्रेलर होता, अजून पूर्ण चित्रपट येणे बाकी असल्याचे खळबळजनक वक्तव्य चीनमधीव वटवाघूळ यांच्यावर संशोधन करणाऱ्या एका महिला व्हायरॉलॉजिस्टने केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. कोरोनासारखे अनेक प्राणघातक व्हायरस वटवाघळात असल्याचे शी झेंगली यांनी म्हटले आहे.

चीनमधील ‘वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी’च्या जगभरात ‘बॅट वूमन’ या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या शी झेंगली डेप्युटी डायरेक्टर आहेत. कोरोनासारखे जीवघेणे व्हायरस वटवाघूळासारख्या जंगली जनावरांत असतात. त्याचा वेळीच शोध घेता आला नाही तर भविष्यात कोरोना सारख्या किंवा त्यापेक्षा अधिक धोकादायक महामारीचा सामना जगाला करावा लागू शकतो, असे शी झेंगली यांनी म्हटले आहे. पण तत्पूर्वी वुहान लॅबमध्ये ‘ऑपरेशन 5 आईज’ने वटवाघूळावर संशोधन सुरू केले असून येथे कोरोनापेक्षा घातक व्हायरस तयार होत असल्याचा दावा केला होता.

याबाबत माहिती देताना शी झेंगली म्हणाल्या की, सरकार आणि शास्रज्ञ यांच्यात व्हायरसवर होत असलेल्या संशोधनाबाबत पारदर्शकता असणे आवश्यक आहे. कोरोना बाबत जगाला उशिरा माहिती दिल्याचा चीनवर सध्या आरोप होत आहे. याबाबत शी झेंगली यांनी प्रतिक्रिया देताना यास ‘विज्ञानवादी राजकारण’ असे म्हटले आहे.

त्याचबरोबर अमेरिका आणि चीन यांच्यात कोरोनामुळे तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या वुहान लॅबमधून कोरोना व्हायरस पसरला असा अमेरिका आरोप करत आहे. पण या आरोपांचे चीनने सातत्याने खंडन केले आहे. अमेरिकेचे हे आरोप शी झेंगली यांनी देखील फेटाळले आहेत. ज्या व्हायरसवर आम्ही काम करत आहोत त्याचे जेनेटिक्स कोरोना व्हायरसशी मिळतेजुळते नसल्याचे झेंगली यांनी सांगितले.

Leave a Comment