महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडून उत्तर प्रदेशातील मजूरांचा छळ


लखनौ : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडूव उत्तर प्रदेशातील कामगारांचा फक्त छळच झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या वर्तणुकीबद्दल माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ‘सावत्र आई’ म्हणून तरी या मजूरांची महाराष्ट्र सरकारने काळजी घ्यायला हवी होती, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांना योगींनी लगावला.


महाराष्ट्राला आपल्या रक्ताचे पाणी करुन मदत करणाऱ्या कामगारांचा महाविकास आघाडी सरकारकडून फक्त छळच झाला. त्यांना लॉकडाऊनमध्ये फसवले गेले. वाईट अवस्थेत त्यांना सोडून देण्यात आले आणि घरी जाण्यास भाग पाडले गेले. या अमानुष वर्तनाबद्दल उद्धव ठाकरे तुम्हाला माणुसकी कधीही क्षमा करणार नाही, असा राग उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आळवला आहे.


उत्तर प्रदेशात आपल्या घरी पोहोचलेल्या सर्व बंधू-भगिनींची काळजी घेतली जाईल. आपल्या कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांच्याबद्दल काळजी करण्याची नाटक करु नका. सर्व कामगारांना विश्वास आहे की आता त्यांची जन्मभूमी त्यांची काळजी घेईल, महाविकास आघाडी सरकार निर्धास्त रहा, असा घणाघातही योगींनी केला आहे.


संजय राऊतजी, भुकेलेला मुलगा फक्त आपल्या आईला शोधतो. महाराष्ट्र सरकारने अगदी ‘सावत्र आई’ म्हणून पाठिंबा दर्शवला असता, तरी महाराष्ट्राला हातभार लावणाऱ्या उत्तर प्रदेशच्या रहिवाशांना मूळगावी परत यावे लागले नसते, असेही योगी म्हणाले.

Leave a Comment