1200 किमी आजारी वडिलांना घेऊन सायकल प्रवास करणाऱ्या ज्योतीचे इवांका ट्रम्पकडून कौतुक


नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लागू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान गुरुग्रामवरुन आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून 1200 किलोमीटर प्रवास करणाऱ्या ज्योतीचे सध्या सोशल मीडियात खूप कौतुक होत आहे. त्यातच तिच्या या कामगिरीची दखल अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्पने घेतली असून याबाबत इवांका यांनी ट्विट करत ज्योतीचे कौतुक केले आहे. आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून 15 वर्षीय ज्योती कुमारीने सात दिवसांत गुरुग्रामवरुन दरभंगा असा तब्बल 1200 किमी अंतर प्रवास केल्यानंतर ज्योतीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

इवांकाने याबाबत ट्विट करताना म्हटले आहे, आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून 15 वर्षाची ज्योती कुमारी सात दिवसात 1,200 किमीचे अंतर पार करत गावी घेऊन गेली. तिने सहनशक्ती आणि प्रेमाच्या या वीरगाथेने भारतीय लोक आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे लक्ष वेधले आहे.

सध्या सर्वच माध्यमांमध्ये ज्योतीच्या या जिद्दीचे कौतुक सर्वत्र होत असून आता तिची दखल सायकलिंग फेडरेशननेही घेतली आहे. ज्योती कुमारी लॉकडाऊन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाऊन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाले. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचे असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांना नेण्याचे ठरवले आणि सात दिवसांत तिने 1200 किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवले.

सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने तिची कहाणी ऐकल्यानंतर ज्योतीला चाचणीसाठी बोलावले आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी म्हटले आहे की, चाचणी ज्योतीने यशस्वीपणे पूर्ण केली, तर राष्ट्रीय सायकलिंग अकादमीच्या कॉम्प्लेक्समध्ये ट्रेनी म्हणून तिची निवड होऊ शकते. आम्ही ज्योतीशी बोललो असून लॉकडाऊन संपल्यानंतर आम्ही तिला दिल्लीला बोलावले आहे. तिच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च संघटनेतर्फे केला जाईल. तिला आपल्यासोबत कोणाला घेऊन यायचे असेल तरीही आम्ही त्याला परवानगी देऊ. आम्ही बिहारमधील आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात आहोत. लॉकडाऊन संपल्यानंतर तिला दिल्लीला चाचणीसाठी कसे पाठवता येईल याची चर्चा सुरु असल्याचे ओंकार सिंह यांनी सांगितले आहे.

Leave a Comment