तीन चिनी बँकांचे 500 कोटी 21 दिवसात फेडा; अनिल अंबानींना लंडनमधील न्यायालयाचे आदेश


मुंबई : कर्जबाजारी झालेले रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी यांच्या मागे लागेल शुक्लकाष्ठ काही केल्या कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. लंडनच्या एका न्यायालयाने अनिल अंबानी यांना वैयक्तिक हमीच्या एका प्रकरणात 21 दिवसांच्या आत तीन चिनी बँकांचे 717 मिलियन डॉलर (जवळपास 500 कोटी रुपये ) फेडण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणात हायकोर्ट ऑफ इंग्लंड अँड वेल्सच्या व्यावसायिक विभागाचे न्यायमूर्ती नीगेल टीयरे म्हणाले की, वैयक्तिकरित्या हमी अनिल अंबानी यांनी दिल्यामुळे ही रक्कम त्यांना फेडावीच लागेल. तर दुसरीकडे हे प्रकरण 2012 मध्ये रिलायन्स कम्युनिकेशनने (आरकॉम) घेतलेल्या कॉर्पोरेट लोनशी संबंधित आहे. पण अनिल अंबानी यांनी या कर्जासाठी वैयक्तिक हमी दिली नव्हती, असा दावा अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी केला आहे.

अनिल अंबानी यांनी या बँकांकडून घेतले आहे कर्ज
इंडस्ट्रियल अँड कमर्शियल बँक ऑफ चायना, (आयसीबीसी) मुंबई शाखा
चायना डेव्हलपमेंट बैंक
एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ चायना

याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अनिल अंबानी यांना लंडनच्या न्यायालयाने 100 मिलियन डॉलर एवढी रक्कम सहा आठवड्यात देण्याचा आदेश दिला होता. अनिल अंबानी यांनी तेव्हा न्यायालयात सांगितले होते की, माझे नेटवर्थ सध्या शून्य झाले आहे आणि कुटुंब मदत करत नसल्यामुळे मी 100 मिलियन डॉलर फेडण्यास सक्षम नाही.

सुमारे 46 हजार कोटी रुपयांचे कर्ज आरकॉमवर आहे. लंडनमधील न्यायालयाच्या आदेशानुसार, वैयक्तिक हमीच्या अंतिम रकमेचं आकलन आरकॉमच्या रिझॉल्यूशन प्लानच्या आधारावर होईल, असे अनिल अंबानी यांच्या प्रवक्त्यांनी सांगितले. रिझॉल्यूशनची प्रक्रिया एकदा पूर्ण झाली की आदेशात सांगितलेली रक्कम फेडली जाईल. आरकॉमच्या कर्जदात्यांनी मंजूर केलेल्या रिझॉल्यूशन प्लॅननुसार ही कथित वैयक्तिक हमीची रक्कम सुमारे 50 टक्के कमी होईल, असेही प्रवक्ते म्हणाले आहेत. दरम्यान आम्ही लंडनमधल्या कोर्टाच्या निर्णयाबाबत कायदेशीर पर्यायांवर विचार करत असल्याचेही प्रवक्त्यांनी सांगितले.

Loading RSS Feed

Leave a Comment