
नवी दिल्ली : पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी कर्नाटकमधील एका वकिलाने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसात तक्रार केल्यानंतर सोनिया यांच्याविरोधात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली.
पीएम केअर्स फंडविरोधात संभ्रम पसरवल्याप्रकरणी सोनिया गांधी यांच्याविरोधात गुन्हा
काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन पीएम केअर्स फंडाबाबत दिशाभूल करणारे ट्विट केल्याचा आरोप वकील के. व्ही. प्रवीण यांनी केला असून, कर्नाटकच्या शिवमोग्गामध्ये ही तक्रार दाखल केली. सोनिया गांधी यांच्याविरोधात पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढाईसाठी मदतीसाठी 28 मार्च रोजी पीएम केअर्स फंडची स्थापना केल्याची घोषणा केली होती. पीएम केअर्स फंडमध्ये कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी जास्तीत जास्त योगदान करण्याचे आवाहन त्यावेळी मोदींनी केल्यानंतर देशभरातील उद्योजकांपासून राजकारण्यांपर्यंत आणि खेळाडू, कलाकारांपासून सामान्यांनी या फंडमध्ये भरघोस मदत केली. पीएम केअर्स फंडची स्थापना एक स्वतंत्र पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. प्राईम मिनिस्टर सिटीझन असिस्टन्स अॅण्ड रिलीफ इन इमर्जन्सी सिच्युएशन फंड (PM CARES Fund) असे या फंडचे पूर्ण नाव आहे.
