फूड पॉयझनिंग – कारणे आणि बचाव करण्याचे उपाय

food
अनेकदा खाल्ल्लेले अन्न बाधून त्यामुळे पोट बिघडणे, उलट्या होणे अशा समस्या उद्भवतात. यामागे खाल्लेया अन्नामध्ये असणाऱ्या बॅक्टेरियांच्या मुळे होणारे इन्फेक्शन कारणीभूत ठरत असते. सामान्यपणे हे इन्फेक्शन योग्य औषधोपचार आणि आहार यांच्यामुळे नियंत्रणात येत असले, तरी मुळात फूड पॉयझनिंग कशामुळे होते आणि ते कसे टाळता येऊ शकेल हे जाणून घेणे अगत्याचे ठरते. बहुतेकवेळा फूड पॉयझनिंग दोन प्रकारच्या जीवाणूंमुळे (bacteria) उद्भवते. ‘इ-कोलाय’ आणि ‘साल्मोनेला’ हे ते दोन जीवाणू आहेत. आपण खात असलेल्या अन्नाच्या मार्फत हे जावाणु आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्यामुळे फूड पॉयझनिंग होऊ शकते.
food1
इ-कोलाय या जीवाणूमुळे फूड पॉयझनिंग मुख्यतः दुध आणि दुग्धजन्य पदार्थांमधून होते. त्याचसोबत अर्धवट शिजविलेले आणि कच्चे मांसाहारी पदार्थ ही या इन्फेक्शनला कारणीभूत ठरू शकतात. पिण्याच्या अशुद्ध पाण्याच्या द्वारेही हे जीवाणू आपल्या शरीरामध्ये प्रवेश करू शकतात. जर एखाद्याची रोगप्रतिकारशक्ती अगदी कमकुवत असेल, तर त्यांच्यासाठी या जीवाणूंच्या मुळे उद्भविलेले इन्फेक्शन घातक ठरू शकते. साल्मोनेला या जीवानुमुळे होणारे फूड पॉयझनिंगही इ-कोलाय प्रमाणेच दुध, दुग्धजन्य पदार्थ, मांसाहारी पदार्थ, कच्ची अंडी, यांतून होऊ शकते. इ-कोलाय आणि साल्मोनेला या जीवाणूंमुळे फूड पॉयझनिंग झाल्यास ताप येणे, उलट्या होणे, जुलाब होणे, पोट दुखणे, मळमळणे अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे उद्भविल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे अगत्याचे आहे.
food2
फूड पॉयझनिंग होऊ नये यासाठी काही गोष्टींची खबरदारी घेणे श्रेयस्कर आहे. आपल्या घरामध्ये आपल्या नकळत अनके तऱ्हेच्या जीवाणूंचा प्रादुर्भाव अनेक माध्यमांतून सातत्याने होत असतो. विशेषतः घरामध्ये ज्या ठिकाणी पाण्याचा वापर जास्त असतो त्या ठिकाणी हे जीवाणू मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत असतात. किचन, बाथरूम या ठिकाणी हे जीवाणू जास्त आढळतात. या जीवाणूंमुळे इन्फेक्शन होऊ नये यासाठी स्वयंपाकघर आणि बाथरूमची नियमित स्वच्छता आवश्यक आहे. तसेच खाद्यपदार्थ हाताळताना हात, आणि त्याचबरोबर स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी, चॉपिंग बोर्ड, सुरी इत्यादी वस्तू स्वच्छ असतील याची खबरदारी घ्यावी. मांसाहारी आणि शाकाहारी पदार्थांसाठी वेगळ्या सुऱ्या आणि कटिंग बोर्ड वापरावेत. प्रत्येक वेळी वापर करून झाल्यांनतर सुरी आणि कटिंग बोर्ड साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून कोरडे करावेत.
food3
आपण शिजवित असलेले अन्न, विशेषतः मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजले असल्याची खात्री करून घ्यावी, भाज्या किंवा फळे कच्ची खाण्यापूर्वी गरम पाण्यामध्ये किंवा थंड पाण्यामध्ये व्हिनेगर मिसळून त्यामध्ये काही काळ घालून ठेऊन मग स्वच्छ धुवून घ्यावीत. फ्रीजमध्ये साठवून ठेवलेले पदार्थ खूप दिवसांपासून ठेवलेले असले, व चांगल्या स्थितीत दिसत असले तरी ते वापरण्याचा मोह टाळावा. ज्या ठिकाणी स्वयंपाक केला जातो तो ओटा, इतर किचन काऊंटर, गॅस स्टोव्ह दर वापरानंतर स्वच्छ पुसून घ्यावेत. अन्न साठविताना ते कच्चे असो, वा शिजविलेले, ते व्यवस्थित साठविणे महत्वाचे असते. हे दोन्ही प्रकारचे अन्नपदार्थ सीलबंद डब्यांमध्ये साठविले जावेत आणि त्याचबरोबर फ्रीजमध्ये जास्त काळ न ठेवता लवकरात लवकर त्यांचा वापर करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment