तंबाखूपासून बनलेली करोना लस अधिक परिणामकारक?

फोटो साभार ट्रायलसाईट न्यूज

ब्रिटीश अमेरिकन टोबॅको फर्मने तंबाखूपासून करोना लस बनविल्याचा दावा केला असून केंटकी बायो प्रोसेसिंगने ही लस तयार केल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे ही लस पटकन बनू शकते, नॉर्मल तापमानात बनविली गेल्याने तिला साठवणूक करण्यासाठी फ्रीज अथवा थंड जागी ठेवण्याची गरज नाही, कमी वेळात अधिक लस बनविणे शक्य आणि ही लस अधिक परिणामकारक असल्याचे दावे या कंपनीकडून केले गेले आहेत. या लसीच्या चाचण्या माणसावर पुढील महिन्यापासून घेण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.

या कंपनीच्या म्हणण्यानुसार अन्य कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा आम्ही बनविलेली लस कमी वेळात आणि अधिक प्रमाणात बनविणे शक्य आहे. ही लस बनविण्यासाठी तंबाखूच्या रोपांचा वापर केला गेला आहे. माणसे ज्या रोगांची सहज शिकार बनतात त्या कोणत्याही रोगांची तंबाखू रोपे वाहक बनत नाहीत त्यामुळे ही लस बनविण्यासाठी आवश्यक असलेली काही खास द्रव्ये या रोपात सहज मिळतात.

ही लस बनविण्यासाठी करोनाचा एक भाग कृत्रिम रित्या तयार करून या तंबाखूच्या पानांवर सोडला गेला. पण या पानांमध्ये त्याचे संक्रमण झाले नाहीच उलट तो विषाणू नाहीसा झाला असे आढळून आले. या लसीच्या प्राथमिक चाचण्या एप्रिल मध्ये घेण्यात आल्या त्याचे परिणाम सकारात्मक आले. त्यामुळे आता माणसावर त्याच्या चाचण्या घेण्यासाठी अन्न आणि औषध विभागाकडे परवानगी मागितली गेल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या चाचण्यांच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण केला गेल्याचेही सांगितले जात आहे.

Leave a Comment