मोदींच्या मनसुब्यांना धक्का; स्थलांतर करु पाहणाऱ्या कंपन्यांना ट्रम्प यांचा इशारा


नवी दिल्ली – ज्या चीनमध्ये कोरोनासारख्या जीवघेण्या व्हायरसची उत्पत्ती झाली त्या चीनमधून आता अनेक दिग्गज कंपन्या आपला काशागोशा गुंडाळण्याच्या तयारीत असतानाच या कंपन्यांना भारताकडे आकर्षित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना ऑफर देऊ केली आहे. पण मोदींच्या मनसुब्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा धक्का दिला आहे.

कोरोनाच्या प्रार्श्वभूमीवर चीनमधून बाहेर पडून भारतामध्ये निर्मिती उद्योग स्थापन करु इच्छिणाऱ्या अ‍ॅपलसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपनीला ट्रम्प यांनी थेट इशाराच दिला आहे. चीनमधून बाहेर पडून अमेरिकेव्यतिरिक्त इतर कोणत्याही देशामध्ये निर्मिती उद्योग सुरु करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर मोठ्या प्रमाणात कर लादण्यात येईल, असे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. अशाप्रकारे कर लादण्याचा इशारा देत मूळच्या अमेरिकन कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या देशामध्ये निर्मिती उद्योग सुरु करावा, असे प्रोत्साहन ट्रम्प देत असल्याचे आपल्या वृत्तामध्ये पीटीआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
ट्रम्प यांच्या मुलाखतीमधील संदर्भांचा यासाठी त्यांनी दाखला दिला आहे. ट्रम्प यांच्याकडून या अमेरिकन कंपन्यांना पुन्हा अमेरिकेमध्ये येऊन निर्मिती उद्योग सुरु करत रोजगारनिर्मितीसाठी हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ट्रम्प यांनी या माध्यमातून पुन्हा एकदा ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या आपल्या अभियानाशी सांगड घालणारी भूमिका स्पष्ट केली आहे.

ट्रम्प यांना मुलाखतीदरम्यान लॉजिस्टीकला बसलेल्या फटका टाळण्यासाठी मूळची अमेरिकन कंपनी असणाऱ्या अ‍ॅपलने आपल्या निर्मिती उद्योगातील बराच मोठा भाग हा भारतामध्ये स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यासंदर्भातील बातम्यांवरुन प्रश्न विचारण्यात आला. अ‍ॅपल आम्ही करारबद्ध केलेल्या कंपन्यांबरोबर स्पर्धा करत आहे. अ‍ॅपलबरोबर अन्याय झाल्यासारखे वाटले तरी आम्ही या गोष्टीला परवानगी देणार नाही. आपणही इतर देशांप्रमाणे आपल्या देशांच्या सीमांचे निर्बंध कठोर केले, तर अ‍ॅपलला त्यांचे १०० टक्के प्रोडक्ट अमेरिकेमध्येच निर्माण करता येतील आणि तसेच व्हायला हवे, असे ट्रम्प यांनी उत्तर दिले.

Leave a Comment