मुदतठेव मोडून शिर्डी संस्थानाने दिले कर्मचाऱ्यांचे वेतन


मुंबई : जगभरातील 212 देशांना आपल्या विळख्यात घेणाऱ्या कोरोना व्हायरसच कहर दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. दरम्यान या व्हायरसचा धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामधील एक म्हणजे लॉकडाऊनचा निर्णय असून देशातील आर्थिक व्यवस्था २२ मार्चच्या लॉकडाउनपासून कोलमडली आहे. सर्वच स्तरांतील संस्थानांना देखील याचा फटका बसला आहे. त्याचबरोबर धार्मिक स्थळांमध्ये असलेल्या दान पेट्यांना देखील याचा मोठा फटका बसल्यामुळे संस्थानात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार कसे करावे असा प्रश्न मोठ्या मंदिर प्रशासनांना पडला आहे. दरम्यान अशा आणीबाणीच्या काळात शिर्डी संस्थानाने मुदतठेव मोडून आपल्या कर्मचाऱ्यांना पगार दिले आहेत.

जवळपास ७०० कोटींच्या घरात शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानाचे वार्षिक उत्पन्न असते. पण मंदिराला गेल्या दोन महिन्यांमध्ये फक्त अडीच कोटींचे दान मिळाले आहे, तेही ऑनलाईन मिळाल्यामुळे मंदिरात कार्यरत असलेल्या ६ हजार कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचा पगार देण्यासाठी मंदिर प्रशासनाला एफडी तोडावी लागली. मंदिराकडे सुमारे २५०० कोटी रुपयांची एफडी आहे.

त्याचप्रमाणे सर्वात जास्त देणग्या मिळणाऱ्या आंध्र प्रदेशमधील तिरुपती बालाजी मंदिराच्या दान पेटीला कोरोनामुळे मोठा फटका बसला आहे. या देवस्थानाला दरमहा सुमारे २०० कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. या मंदिरात २२ हजार कर्मचारी आहेत. त्यांचे वेतन आणि इतर गोष्टींवर ११० कोटी रूपये महिन्याला खर्च करण्यात येतो. त्यामुळे मंदिर प्रशासन हा भलामोठा खर्च भागवण्यासाठी एफडी किंवा सोन्याऐवजी दुसरा मार्ग शोधत आहे.

Leave a Comment