पंतप्रधान मोदींप्रति बिल गेट्स यांनी व्यक्त केली कृतज्ञता


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये जीवघेण्या कोरोना व्हायरसने हाहाकार माजवला आहेच, त्याला भारत देखील त्याला अपवाद नाही. देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत वाढ होऊन काल ती ८० हजारांच्या जवळ पोहचली आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेचे थांबलेलं चक्र सुरू करण्याची भारत तयारी करत आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मालक आणि सह-संस्थापक बिल गेट्स यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली.

बिल गेट्स यांनी यावेळी कोरोनाच्या संकटामुळे जागतिक स्तरावर पडणारा सामाजिक आणि आर्थिक ताण किमान राहिल यासंदर्भात उपाययोजना करतानाची भारताची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच लस निर्मिती, चाचणी आणि सर्वांपर्यंत उपचार भारताच्या भूमिकेमुळे पोहचण्यासाठी मार्ग सुखकर होईल, अशी अपेक्षा बिल गेट्स यांनी व्यक्त केली. तर तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलताना, सर्वांनी एकत्र मिळून कोरोनाची लढाई लढली पाहिजे, असे म्हटले होते.

कोरोनाच्या समस्या आणि या आजाराशी लढण्याच्या उपाययोजना यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिल गेट्स यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. त्याचबरोबर मोदी यांनी यावेळी कोरोनाविरोधात भारताने केलेल्या उपाययोजनांचीही त्यांना माहिती दिली. आपल्या सर्व नागरिकांच्या मदतीने भारत कोरोनाविरोधातील ही लढाई कठोरपणे लढत आहे. आम्ही सर्वांपर्यंत कोरोनाशी निगडित सर्व माहिती पोहोचवण्यात यशस्वी झालो आहोत. जगभरातील अन्य देशही याचा लाभ घेऊ शकतात. अशा कठीण परिस्थितीत कोणतेही पूर्वग्रह न ठेवता सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असे मोदी यांनी म्हटले.

जगासह देशाला स्वच्छतेबाबत स्वच्छ भारत अभियानाद्वारे पहिल्यापासूनच जागरूक केले जात होते. आता तेच अभियान कोरोना व्हायरसच्या लढाईत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. गेट्स फाऊंडेशन कोरोनाविरोधातील लढाईत भारतासोबतच जगभरातील निरनिराळ्या भागांमध्ये मदत पोहोचवत असून ते खरोखरच उल्लेखनीय असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

Leave a Comment