रेल्वे प्रशासनाने रेल्वे तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्ये केला महत्वपूर्ण बदल


नवी दिल्ली – ३० जूनपर्यंत रेल्वेच्या तिकिटांचे बुकींग करणाऱ्या प्रवाशांची तिकीटे रद्द करण्याची भारतीय रेल्वे प्रशासनाने घोषणा केली आहे. त्याचबरोबर प्रवाशांना या तिकिटांचे पैसे परत करण्यात येणार असल्याचेही सांगितले आहे. या दरम्यान, रेल्वेकडून सोडण्यात आलेल्या विशेष रेल्वे आणि श्रमिक विशेष रेल्वे यामात्र सुरू राहतील. ही माहिती गुरुवारी रेल्वेकडून देण्यात आली. त्याचबरोबर रेल्वे प्रशासनाने आता ट्रेन तिकीटांच्या ऑनलाइन बुकिंगमध्येही महत्वपूर्ण बदल केला आहे.

तुम्ही लॉकडाउनदरम्यान जर विशेष ट्रेनने प्रवास करणार असाल तर तुम्हाला तिकीट बुक करताना आता अजून एक महत्त्वाची माहिती द्यावी लागणार आहे. रेल्वे प्रवाशांना आता ते ज्या ठिकाणी जाणार आहेत तेथील पूर्ण पत्ता द्यावा लागणार आहे. भविष्यात जर गरज पडली तर त्यांचे सहजपणे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करता येणे शक्य व्हावे यासाठी ही माहिती आता आयआरसीटीसीला द्यावी लागणार आहे. आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर कालपासून तिकीट बुक करतेवेळी ही नवीन माहिती विचारण्यास सुरूवात झाली आहे.

दरम्यान, रेल्वेने यापूर्वी बुधवारी लॉकडाऊन विशेष रेल्वेसाठी २२ मे पासून वेटिंग तिकिटांची सुरुवात करण्याचीही घोषणा केली आहे. सध्या, केवळ कन्फर्म तिकिटांचेच बुकिंग सुरू आहे. परंतु, २२ मे पासून सुरु होणाऱ्या प्रवासासाठी १५ मेपासून सुरु होणाऱ्या तिकीट बुकिंगमध्ये वेटिंग लिस्टचाही समावेश असेल. एसीमध्ये २०, एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये २०, सेकंड एसीमध्ये ५०, थर्ड एसीमध्ये १००, एसी चेअर कारमध्ये १०० आणि स्लीपरमध्ये २०० पर्यंट वेटिंग तिकीटे दिले जातील.

Leave a Comment