ऑनलाईन दारु खरेदीत पुणेकरांनी मारली बाजी


पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे तळीरामांचे पुरते हाल झाले होते. त्यातच काळ्या बाजाराने विकल्या जाणाऱ्या दारुला आळा बसवा यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ई टोकन पद्धतीला पसंती दिली आणि त्याला पुणेकरांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. पुणेकरांनी मंगळवारी पहिल्याच दिवशी हायटेक फंडा वापरत ई टोकन घेतले. ऑनलाईन दारु खरेदीसाठी तब्बल 10 हजार 877 पुणेकरांनी नोंदणी केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाईन शॉप समोरील गर्दी टाळण्यासाठी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ई टोकन पद्धत सुरु केली आहे‌.

www.mahaexcise.com या संकेतस्थळावर ही ई-टोकन सुविधा उपलब्ध आहे. या संकेत स्थळावर मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांनी रजिस्ट्रेशन करून ई-टोकन घेणे आता आवश्यक आहे. ग्राहकाला सुरुवातीला आपला मोबाईल नंबर आणि नाव नमूद करायचे आहे. त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटणवर क्लिक करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पार पडल्यावर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्य विक्री दुकानांची यादी मिळेल. यानंतर एका दुकानाची निवड केल्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. ग्राहकाने आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर त्याला ई-टोकन मिळणार आहे. त्यानंतर या टोकननुसार ग्राहक आपल्या सोईच्या वेळी संबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.

Leave a Comment