मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देणार परप्रांतीय मजुरांना प्रवास खर्च


मुंबई : देशासह राज्यात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील मजुरांना आपापल्या राज्यात पाठवण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला असून रेल्वेच्या माध्यमातून या मजुरांना आपल्या राज्यात पाठवले जाणार आहे. पण, त्यांच्या प्रवास खर्चावरून काही दिवसांपासून संभ्रम निर्माण झाला होता. दरम्यान, मजुरांच्या प्रवासाच्या खर्चाचा प्रश्न आता सुटला असून मुख्यमंत्री सहायता निधीमधून हा खर्च देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विटरद्वारे माहिती दिल्यामुळे परप्रांतीय मजुरांना आता त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी आणि इतर राज्यांत अडकलेल्या राज्यातील मजुरांना महाराष्ट्रात आणण्यासाठी आकारण्यात येणाऱ्या रेल्वे प्रवासाचे पैसे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहेत.


यासंदर्भातील माहिती सीएमओ महाराष्ट्र या ट्विटर हँडलवरून ट्विट करत देण्यात आली असून ट्विटमध्ये सांगितल्याप्रमाणे, परराज्यातील मजूर त्यांच्या राज्यात परतत आहेत. तसेच महाराष्ट्रातील मजूर इतर राज्यातून परत येत आहेत. त्यांच्याकडे रेल्वे प्रवासाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत. ही गोष्ट लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून तिकिटाचे शुल्क भरण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे मजुरांचा कामधंदा गेल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची भ्रांत झाली आहे. अशातच अनेक मजुरांनी पायीच आपल्या घराची वाट धरली आहे. त्यांच्याकडे प्रवास भाड्याचे पैसे नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार, ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्यात येणार आहे.


मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर टिकास्त्र डागले आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट करत महाविकासआघाडी सरकारने स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे यात्रेचा खर्च मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्याचा निर्णय घेतला आहे. संवेदना आणि सहवेदना या प्रत्येक सत्ताधाऱ्यांना असाव्यात. परंतु रेल्वे तिकीटाची 85% रक्कम देऊ असे खोटे सांगणाऱ्या भाजप नेत्यांचे हृदय निष्ठूर असल्याची टीका त्यांनी केली आहे.

Leave a Comment