केंद्राचे राज्यांना निर्देश; रस्ते तसेच रेल्वे ट्रॅकवरुन पायी जाणाऱ्या मजूरांना थांबवा


नवी दिल्ली : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्राने देशात लॉकडाऊन लागू केला असून त्यातच सध्या या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. अशा परिस्थितीत देशभरातील विविध राज्यांमध्ये अडकलेले स्थलांतरित मजूर आपापल्या घराकडे परत जाताना दिसत आहे. लॉकडाऊनमुळे देशातील सर्वच सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असल्यामुळे अनेकांनी पायीच आपल्या राज्यात जाण्याचा निर्णय घेतला आहे. पण आता केंद्रीय गृह मंत्रालयाने याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारांना महत्वाचे निर्देश दिले आहेत. रस्त्यांवरुन तसेच रेल्वे ट्रॅकवरुन पायी आपल्या राज्यात जाण्यापासून मजूर आणि कामगारांना थांबवावे असे पत्रक जारी करत गृह मंत्रालयाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.

अनके मजूर राज्य सरकारच्या प्रयत्नानंतरही पायी जाण्याचा विचार करत असतील तर त्यांना विश्वासात घेऊन जवळच्या शेल्टर होममध्ये त्यांची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय करण्याचेही निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. येत्या काळात आणखीन श्रमिक ट्रेन चालवल्या जाणार असून या ट्रेनसंदर्भात राज्य सरकारांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असेही केंद्राने म्हटले आहे. यासंदर्भात केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे.

स्थलांतरित मजुरांसाठी चालवण्यात येणाऱ्या विशेष श्रमिक ट्रेन्ससाठी प्रशासनाने रेल्वेचे सहकार्य करावे असेही सर्व राज्यांच्या सचिवांनी या पत्रामध्ये म्हटले आहे. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्याबरोबर रविवारी झालेल्या बैठकीचा उल्लेख करताना भल्ला यांनी प्रवासी कामगार रस्त्यांवरुन आणि लोहमार्गांवरुन चालत आपल्या राज्यांकडे जाताना झालेल्या गंभीर अपघातांची केंद्र सरकारने दखल घेतल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment