कोरोनामुक्त झालेले जितेंद्र आव्हाड म्हणतात; पुन्हा लढण्यास सज्ज होऊया


मुंबई – राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जितेंद्र आव्हाड यांनी उपचाराच्या मदतीने कोरोनावर मात केली असून आज त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.


राज्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सातत्याने नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर असणाऱ्या अनेक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होत असल्याच्या घटना समोर आल्या. याला माध्यम प्रतिनिधी देखील अपवाद नव्हते. त्यातच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे चाचणीतून निष्पन्न झाले. आव्हाड यांना कोरोनाचे निदान झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. अखेर आव्हाड यांनी जिद्द व उपचाराच्या मदतीने कोरोनावर मात केली आहे. यासंदर्भात ट्विट करून आव्हाड यांनी माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईला यश आले असून, मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढेही तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहु द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया, असे ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

Leave a Comment