श्रीलंकेनंतर या देशाची बीसीसीआयला ऑफर; आमच्या देशात खेळवा आयपीएल


नवी दिल्ली – जगभरातील बहुतांश देशांना बसलेल्या कोरोनाच्या फटक्यामुळे क्रिडा क्षेत्र देखील बचावलेला नाही. त्यातच आपल्या देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने सलग तिसऱ्यांदा 17 मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केली आहे. दरम्यान कोरोनामुळे आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा बीसीसीआयने रद्द केल्या असून आयपीएलचा तेरावा हंगाम पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आला आहे. आयपीएल स्पर्धा पूर्णपणे रद्द केल्यास बीसीसीआयला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. बीसीसीआय यासाठीच वर्षाअखेरीस स्पर्धेचे आयोजन करता येणे शक्य आहे का याची चाचपणी करत आहेत. यासोबत बीसीसीआयसमोर यंदाचा हंगाम हा बाहेरील देशात भरवण्याचाही पर्याय उभा आहे. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने काही दिवसांपूर्वी लंकेत आयपीएल खेळवण्याचा पर्याय बीसीसीआयसमोर ठेवला होता.

त्यानंतर आता बीसीसीआयसमोर संयुक्त अरब अमिरातने (UAE) ही आयपीएल आयोजन करण्याची तयारी दाखवली आहे. या वृत्ताला बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना दुजोरा देत बीसीसीआयची बाजू स्पष्ट केली आहे. संयुक्त अरब अमिरात क्रिकेट बोर्डाने आयपीएलच्या आयोजनासंदर्भात उत्सुकता दाखवलेली आहे. परंतु सध्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर बंदी असल्यामुळे यावर बीसीसीआय कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही. खेळाडू व इतर सदस्यांची सुरक्षा हा आमचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. सध्या संपूर्ण जग कोरोनामुळे ठप्प झालेले आहे. अशा परिस्थितीत आम्ही आता कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही.

सुमारे अडीच ते तीन हजार कोटींचे आयपीएल रद्द झाल्यास बीसीसीआयला आर्थिक नुकसान होण्याचा अंदाज आहे. याचसोबत प्रत्येक संघमालकांनाही १०० कोटींपेक्षा जास्त फटका बसणार आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या बीसीसीआय बैठकीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी आयपीएल स्पर्धा खेळवली जाणे गरजेचे असल्याचे मत मांडण्यात आले होते. आतापर्यंत श्रीलंका आणि संयुक्त अरब अमिरात या दोन देशांनी आयपीएलच्या आयोजनाबद्दल उत्सुकता दाखवली आहे. पण कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता बीसीसीआय अद्याप यावर कोणताही निर्णय घेण्याच्या तयारीत नाही.

Leave a Comment