शिक्कामोर्तब ; विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे व अमोल मिटकरी रिंगणात


मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषद निवडणुकीसाठी अखेर आपले उमेदवार जाहीर केले असून शिवसेना, भाजप आणि काँग्रेसनंतर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराची नावे जाहीर केली असून यासंदर्भातील माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी या दोन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल विश्वासही व्यक्त केला.

कोरोनासोबतच राज्यातील राजकीय वातावरण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तापायला लागले आहे. २१ मे रोजी विधान परिषदेच्या ९ जागांसाठी मतदान होत असून, जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. शिवसेना, भाजपा, काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.


साताऱ्याचे शशिकांत शिंदे आणि अकोल्याचे अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या दोन जागांसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही उमेदवारांच्या नावांची राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घोषणा केली. शशिकांत शिंदे (सातारा) व अमोल मिटकरी (अकोला) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार असतील. हे दोन्ही उमेदवार यशस्वी होऊन विधान परिषदेत उत्तम कामगिरी बजावतील याची मला खात्री असल्याचे जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

Leave a Comment