नवीन पदभार स्वीकारल्यानंतर प्रविण परदेशींचा रजेसाठी अर्ज


मुंबई : बृह्नमुंबई महापालिकेच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी झालेल्या प्रविण परदेशी यांनी रजेसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. सरकारकडे परदेशी यांनी ई मेलद्वारे रजेसाठी अर्ज केला आहे. बदली झाल्यानंतर प्रविण परदेशींनी नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदाचा पदभार स्वीकारला आणि त्यानंतर रजेसाठी अर्ज केला.

अद्याप परदेशींनी केलेला अर्ज स्वीकारलेला नाही. आज आणि उद्या मंत्रालयाला सुट्टी असल्यामुळे परदेशींचा रजेचा अर्ज सोमवारी स्वीकारला जाण्याची शक्यता आहे. परदेशी यांच्या बदलीमागे मुख्य सचिव अजय मेहता आणि त्यांच्यात असलेले मतभेद कारणीभूत असल्याची चर्चा आहे. त्याचबरोबर मुंबईतील हाताबाहेर जाणारी कोरोनाची स्थिती, प्रशासनात नसलेला समन्वय, आरोग्य व्यवस्था सुधारण्यात आलेले अपयश, लॉकडाऊनबाबत काढलेले वेगवेगळे आदेश यावरून मुंबईत गोंधळाच वातावरण आहे. त्यातच सायन रुग्णालयात रुग्णांच्या वॉर्डमध्ये कोरोनाचे मृतदेह ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि मुंबई महापालिका आणि राज्य सरकावर जोरदार टीका होऊ लागली. परदेशींच्या बदलीचे हे तत्कालीन कारण ठरले. आता नाराज असलेल्या परदेशींनी रजेसाठी अर्ज केला असून ते त्यापुढे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Loading RSS Feed

Leave a Comment