कोरोनामुक्त रुग्णांना आता ‘या’ अटींनुसार मिळणार रुग्णालयातून डिस्चार्ज


नवी दिल्ली : देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढत असून आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हेच लक्षात घेत कोरोनामुक्त रुग्णांच्या डिस्चार्जबाबत नवीन मार्गदर्शक तत्व जारी केले आहेत. ज्यामध्ये रुग्णाच्या टेस्ट आणि होम आयसोलेशनच्या नियमात बदल करण्यात आले आहेत.

कोरोनामुक्त रुग्णाला आधी डिस्चार्ज देण्यापूर्वी कोरोना टेस्ट केल्या जायच्या, पण आता सरसकट सर्व कोरोना रुग्णांची RT-PCR टेस्ट होणार नाही. तर फक्त गंभीर रुग्णांचीच टेस्ट केली जाणार आहे. इतर रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसली नाही तर त्यांना 10 दिवसांतच रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे.


सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये जर कोरोनाची लक्षणे कमी झाली आणि त्यांना ताप येत नसेल, ऑक्सिजनची गरज नसेल तर 10 दिवसांनंतर RT PCR टेस्ट न करता डिस्चार्ज दिला जाणार आहे.

मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना कोविड हेल्थ सेंटरमध्ये ऑक्सिजन बेड्सवर ठेवले जाईल. त्यांच्या शरीराचे तापमान आणि शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासली जाईल. 3 दिवसांपर्यंत ताप उतरला आणि पुढील 4 दिवस ऑक्सिजनची पातळी 95 टक्क्यांपेक्षा जास्त झाली तर रुग्णाला 10 दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाईल. पण त्याला डिस्चार्ज देताना ताप नाही, श्वास घेण्यात समस्या आणि ऑक्सिजनची गरज भासत नाही, याची खात्री करून घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांनाही डिस्चार्ज देण्यापूर्वी टेस्टिंग करण्याची गरज नाही.

गंभीर लक्षणे व ऑक्सिजन रिपोर्टवर जे रुग्ण आहेत, त्यांची लक्षणे गेल्यानंतर आणि सलग 3 दिवस ऑक्सिजनची पातळी नियंत्रणात राहिल्यास डिस्चार्ज मिळेल. त्याचबरोबर इतर गंभीर आजार असलेल्या कोरोना रुग्णांना क्लिनिकल रिकव्हरी आणि RT-PCR टेस्‍ट निगेटिव्ह आल्यानंतरच डिस्चार्ज मिळेल. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्या रुग्णाला घरी 14 ऐवजी 7 दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागेल. 14 व्या दिवसापासून टेली-कॉन्फरन्सद्वारे रुग्णाचा फॉलोअप घेतला जाईल.

Leave a Comment