राज्यातील अनेक शहरांमध्ये अडकलेल्यांना लालपरी फुकटात सोडणार गावी


मुंबई – देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यातील विविध भागात अडकलेल्या विद्यार्थी, नोकरदार तसेच नागरिकांच्या घरवापसीचा मार्ग खुला केला आहे. त्यासाठी त्यांना रीतसर परवानग्या देण्यात येत आहे. पण यादरम्यान खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची होणारी लूट लक्षात घेता महाराष्ट राज्य मार्ग परिवहन महामंडळाने या नागरिकांसाठी बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ही मोफत बससेवा सोमवारपासून सुरु करण्यात येत असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले आहे.

एकाच ठिकाणी जाणाऱ्या लोकांनी २२ जणांची यादी तयार करून ती यादी जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, तर गावाकडील लोकांनी ही यादी जिल्हाधिकारी किंवा तहसीलदारांकडे सोपवावी. यामध्ये त्यांचा मोबाइल नंबर, आधारकार्ड, राज्यात कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी जायाचे आहे, याची माहिती लिहायची आहे. २२ जणांचा ग्रुप झाल्यानंतर पोलीस किंवा जिल्हाधिकारी त्यांना बस सुटण्याचे ठिकाण सांगतील, त्यानंतर डेपोत येऊन बसमधून गावाला जायचे आहे. या बसने मुंबई आणि पुण्यातील कन्टोनमेंट झोनमधील नागरिकांना प्रवास करता येणार नाही. तसेच ही बससेवा १८ मे पर्यंतच सुरु राहणार आहे. त्यानंतर पुढील निर्णय राज्य सरकारच्या आदेशानुसार घेण्यात येईल. दरम्यान, या बसवरील नोंदणीसाठी ऑनलाईन पोर्टलही सुरु करण्यात येत असून सोमवारपासून ते उपलब्ध होईल. या ऑनलाईन पोर्टलद्वारेही आपणास नोंदणी करता येईल.

राज्य परिवहन महामंडळाने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी परिपत्रक काढून सर्वच विभागांना सूचना दिल्या आहेत. नोकरी, व्यवसाय, शिक्षणासाठी राहणारे लॉकडाऊनमुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. इच्छित स्थळी पोहोचविण्यासाठी त्यांच्याकरिता एसटी बस सोडण्यात येणार आहे. त्यासाठी काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या आहेत. ज्या गावात, शहरात प्रवासी जाण्यास तयार होतील, तिथेच बस सोडण्यात येणार आहे. प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन प्रवासाचा मार्ग आणि शेवटचे ठिकाण ठरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर ही बस प्रवासादरम्यान अन्यत्र कुठेही थांबणार नसल्यामुळे एका ठिकाणाहून निघालेली बस ठरविलेल्या शहर, गावातच थांबेल, वाटेमध्ये कोणत्याही प्रवाशास उतरण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

Leave a Comment