पक्षाच्या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही; पंकजा मुंडे


मुंबई – भारतीय जनता पक्षाने विधान परिषदच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेत्यांना डावलत नव्या चेहऱ्यांना संधी दिली असून भाजपकडून एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलण्यात आले आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर प्रतिक्रिया दिली असून मला या निर्णयाचा अजिबात धक्का बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

ट्विटरच्या माध्यमातून पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आईंना, ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना, तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही, बस…साहेबांचे आशिर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपाच्या त्या चारही उमेदवारांना आशिर्वाद.


नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके , डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. अजित गोपछडे, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील आणि गोपीचंद पडळकर या चार नावांची भाजपच्या केंद्रीय समितीने घोषणा केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत या चौघांनी उमेदवारी अर्जही दाखल केले.

एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे आदी विधानसभेच्या वेळी उमेदवारी नाकारलेले किंवा पराभूत झालेले विधान परिषदेची उमेदवारी मिळावी म्हणून इच्छूक होते. खडसे, मुंडे, तावडे यांना भाजपमधील पक्षांतर्गत शीतयुद्धात संधी मिळू नये, असाच प्रयत्न सुरू होता. एका नेत्याला विधान परिषदेची उमेदवारी दिल्यास अन्य नेत्यांवर अन्याय केल्यासारखे झाले असते. यातूनच माजी मंत्र्यांचा नावांचा विचार झाला नाही, असे भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.

Leave a Comment