मागील चोवीस तासांत देशभरात आढळले कोरोनाचे 3 हजार 320 नवे रुग्ण, तर 95 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – जगभरातील 212 देशांमध्ये थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून देशभरात मागील चोवीस तासांत 3 हजार 320 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाने 95 जणांचा बळी घेतला आहे. देशभरातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या आता 59 हजार 662 वर पोहचली आहे. ज्यामध्ये सध्या उपचार सुरू असलेले 39 हजार 834 रुग्ण, उपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेले 17 हजार 847 जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या 1 हजार 981 जणांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग पुन्हा वाढला असून तो 12 दिवसांवरून आता 10 दिवसांवर आला आहे. कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तमिळनाडू, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये वाढत असल्यामुळे केंद्राची पथके सातत्याने या राज्यांमध्ये पाहणी करत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अगरवाल यांनी दिली.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबरोबरच लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नही केला जात आहे. त्याअंतर्गत मजूर, विद्यार्थी, यात्रेकरू, पर्यटक आदींना गावी पोहोचवण्यासाठी बस व रेल्वेंना अनुमती देण्यात आलेली आहे. रेल्वे मंत्रालयाने आत्तापर्यंत 222 विशेष रेल्वे सोडल्या असून अडीच लाखांहून अधिक लोकांच्या प्रवासाची व्यवस्था केली आहे, अशी महिती केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली.

Leave a Comment