रिलायन्स जिओमध्ये ‘व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स’ करणार 11,367 कोटींची गुंतवणूक


नवी दिल्ली – मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने लॉकडाउनदरम्यान तिसरा मोठा करार केला असून काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये गुंतवणूक करण्याची फेसबुक आणि सिल्वर लेक या कंपन्यांनी घोषणा केल्यानंतर आता जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अमेरिकेची अजून एक मोठी कंपनी गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये अमेरिकेची खासगी इक्विटी फर्म ‘व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स’ 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

अमेरिकेची व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 11,367 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. या गुंतवणूकीद्वारे व्हिस्टा कंपनी जिओमध्ये 2.32 टक्के हिस्सेदारी खरेदी करेल, अशी माहिती आज रिलायन्स इंडस्ट्रीज आणि जिओ प्लॅटफॉर्म्सकडून देण्यात आली. जिओ प्लॅटफॉर्म्सची इक्विटी व्हॅल्यू या गुंतवणूकीमुळे 4.91 लाख कोटी रुपये आणि एंटरप्राइज व्हॅल्यू 5.16 लाख कोटी होईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.

व्हिस्टाची जगातील पाचवी सर्वात मोठी ‘एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर’ बनवणारी कंपनी म्हणून ओळख आहे. भारतात जिओ डिजिटल प्लॅटफॉर्मचे मोठे काम करत आहे. आम्ही भारतात कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी जिओ प्लॅटफॉर्म्ससोबत काम करण्यास खूप उत्सुक असल्याची प्रतिक्रिया व्हिस्टाचे चेअरमन आणि सीईओ रॉबर्ट एफ स्मिथ यांनी दिली.

तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत या करारामुळे जिओ प्लॅटफॉर्म्समध्ये 60,596 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. फेसबुकने काही दिवसांपूर्वीच 9.99 टक्के भागभांडवल खरेदी करताना जिओमध्ये तब्बल 43 हजार 574 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर अमेरिकेच्या सिल्वर लेक कंपनीने गेल्या आठवड्यात केवळ एक टक्के हिस्सेदारीसाठी जिओमध्ये तब्बल 5,656 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आणि आता अजून एका अमेरिकी कंपनीने जिओमध्ये गुंतवणूक केली आहे. तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत हा जिओ प्लॅटफॉर्मचा तिसरा मोठा करार आहे.

Leave a Comment